
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या आडून माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांची बदनामी केली म्हणून भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात दाखल मानहानीच्या दाव्याचा निकाल काल लागला.
याप्रकरणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश विनय बी. कांबळे यांनी चित्ते यांनी मानहानीपोटी आदिक यांना एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अनुराधाताई आदिक यांचे वकील अॅड. तुषार आदिक यांनी दिली.
अनुराधा आदिक यांनी भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात मे 2021 मध्ये मानहानीचा दावा दाखल केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी चौकात बसविण्याबाबत अंतिम मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे प्रलंबित आहे. असे असताना शिवजयंतीच्या दिवशी 31 मार्च 2021 रोजी छत्रपती शिवाजी चौकात काही लोकांनी नियमबाह्य पध्दतीने पुतळा आणून ठेवला. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने हा पुतळा काढला.
त्याच्याशी अनुराधाताई आदिक यांचा काही संबंध नव्हता. मात्र, पुतळ्याची जागा बदलणार असल्याचा त्यांच्यावर खोटा आरोप करून श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने 4 एप्रिल 2021 रोजी श्रीरामपूर बंदचे आवाहन केले. याबाबत पोलीस ठाण्यात निवेदन देवून तसेच शहरात रिक्षा फिरवून पत्रकेही वाटण्यात आली होती.
शिवाय इलेक्ट्रॉनिक माध्यामांना मुलाखत देताना आदिक यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. मात्र, अशी कोणतीही भूमिका आदिक यांनी घेतली नव्हती. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आडून त्यांची बदनामी करण्यात आली, अशी भावना झाल्याने चित्ते यांच्याविरोधात आदिक यांनी 5 कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला होता.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्वतः अनुराधा आदिक, जगदीश थेटे, तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय सानप, पालिकेचे कर्मचारी अनंत शेळके, आदिक यांचे स्वीय सहाय्यक अविनाश पोहेकर, प्रभात मल्लू शिंदे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश विनय कांबळे यांनी चित्ते यांनी आदिक यांची मानहानी केल्याचा निष्कर्ष काढला.
तसेच मानहानीपोटी चित्ते यांनी आदिकांना 1 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपिल करण्यासाठी श्री. चित्ते यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेत. या दाव्यात अनुराधाताई आदिक यांच्यावतीने अॅड.तुषार आदिक यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.सुशिल पांडे, अॅड.वैभव गुगळे यांनी सहाय्य केले.
या निकालाबाबत प्रतिक्रिया विचारली असता माजी नगराध्य़क्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर करते.
प्रकाश चित्ते म्हणाले, अद्याप मला न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळालेली नाही. ती मिळाल्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपिल करणार आहे.