श्रीरामपूरमध्ये करोना लसीचा तुटवडा

श्रीरामपूरमध्ये करोना लसीचा तुटवडा

श्रीरामपूर | प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्‍यातील सर्वच लसीकरण केंद्रावर गेल्या दोन आठवड्यापासून कोवॅक्सिन या लसीचा तुटवडा आहे. शासनाने कोवॅक्सिन ही लस त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. शासनाने लसीकरण मोहिम हाती घेतल्यानंतर सुरुवातीला नागरिकांमधून कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.

मात्र, जनजागृतीनंतर नागरिकांमधून उत्साहाने लसीकरण केले जाऊ लागले. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन लस उपलब्धतेनुसार नागरिकांना दिल्या गेल्या. मात्र कोवॅक्सिन या लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना ४५ दिवस उलटूनही दुसरा डोस मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. शासन एकीकडे लसीकरण करण्यासाठी जनजागृती करत असताना दुसरीकडे मात्र लसींचा जाणवणारा तुटवडा नागरिकांच्या जिवाशी खेळणारा ठरत आहे.

दोन डोसमधले अंतर संपूनही दुसरा डोस वेळेत मिळत नसल्याने सकाळपासून लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहूनही लसीअभावी माघारी फिरण्याची वेळ अनेकदा नागरिकांवर येते. तालुक्यातील सहाही उपकेंद्र अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, गेल्या मंगळवारी कोवॅक्सिन लसीचे १२० डोस उपलब्ध झाले होते. यावेळी दोनशेहून अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र लस संपल्याने अनेक नागरिकांना हात हलवीत माघारी परतावे लागले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com