श्रीरामपुरात 60 पैकी 4 जण करोना पॉझिटीव्ह

56 जण निगेटीव्ह; 90 अहवालांची प्रतिक्षा
श्रीरामपुरात 60 पैकी 4 जण करोना पॉझिटीव्ह

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

शहरातील वार्ड नंबर 2 या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये काल घेण्यात आलेल्या ‘रेपीड टेस्ट’मध्ये चार जणांना करोनाची बाधा आढळून आली. त्यांना येथील सेंट लुक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल 90 अहवालाची प्रतिक्षा आहे.

प्रशासनाकडून गेले तीन दिवस वार्ड नंबर दोन मधील पूर्वी सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तसेच इतर नागरिकांची तपासणी (टेस्ट) केली जात आहे. यामध्ये गुरुवारी 58, शुक्रवारी 16 तर आज शनिवारी 60 लोकांची तपासणी करण्यात आली. कालची टेस्ट ही रेपीड टेस्ट होती. त्यामध्ये 60 पैकी 56 जण निगेटिव्ह आले तर चार जण बाधित आढळले. यामध्ये एक पुरुष, दोन मुले व एक मुलगी आहे. या सर्वांना सेंट लुक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तत्पूर्वी सकाळी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. वसंतराव जमदाडे आदींनी शाळा नंबर पाच येथील तपासणी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर या परिसरातील डॉ. अफरोज तांबोळी, डॉ. सय्यद मुजाहिद, डॉ. शफी शेख, डॉ. सलीम शेख, डॉ. नवनीत जोशी, सोहेल दारूवाला, तौफिक शेख आदींशी या भागातील रुग्णसंख्या, त्यांचे शेजारी, आरोग्य खात्याकडून केल्या जाणार्‍या उपाययोजना याबाबत चर्चा केली.

उद्या होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे या भागातील नागरिकांसाठी खास तपासणी व मोफत औषध वाटप शिबीर आयोजित करण्यात आले असून याबाबत डॉ. प्रशांत गंगवाल, डॉ. रियाज पटेल, डॉ. सुरज थोरात, डॉ. आशिष जैस्वाल व इतर होमिओपॅथिक डॉक्टरांनी सुद्धा येथे भेट देऊन पाहणी केली.

उद्या देखील या भागातील लोकांची रॅपिड चाचणी घेतली जाणार आहे. काल नवीन चार रुग्ण आढळल्याने या भागामध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, अंतर राखावे, वयस्कर नागरिक व मुलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन या भागातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

दळवी वस्ती, डॉ. मोरगे हॉस्पिटलच्याजवळच राहत असलेले ठेकेदार करोना बाधित आढळून आल्यानंतर त्यास नगर रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य त्याच्या चालकासह काही नातेवाईक व मित्रपरिवारातील काहींजणांना आज सकाळी जावून ताब्यात घेण्यात येणार आहे. त्याचा चालक हा मोरगे वस्तीवर राहत असून त्याच्या शोधासाठी काही डॉकटर व त्यांचे पथक रवाना करण्यात आले होते.

तीन जणांचा मृत्यू चार जण बरे होवून घरी परतले 34 जण संतलुक येथे उपचार घेत आहेत तर अन्य रुग्ण नगर येथे उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com