
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगावातील करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव 6 एप्रिलपासून 19 एप्रिल सायंकाळी 6 वाजेपर्यंत कन्टेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केले आहे.
याची सर्व नागरिकांनी नोंद घेवून आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे. या प्रतिबंधित काळात नागरिकांचे आगमन व प्रस्थान यास बंदी करण्यात आली आहे. तसेच वाहनांचे अवागमन अशा इतर बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. सध्या करोनाचे जास्त रुग्ण आढळत आहेत.
नागरिक म्हणावी तशी काळजी घेत नाहीत असे दिसते. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आदेशानुसार माजी चेअरमन सुरेश गलांडे, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, ग्रामविकास अधिकारी हितेश ढूमणे आदींनी गावात फिरून आदेशाची माहिती देत दक्षतेच्या सूचना दिल्या. गटविकास अधिकारी दिघे यांनी आज उंदिरगाव परिसरात भेट देऊन सर्व पाहणी केली. काही किराणा दुकाने उघडी आढळल्याने ती तातडीने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.