निगेटिव्ह पॉझिटिव्ह चक्रव्युहात सामान्यांचा जीव टांगणीला
सार्वमत

निगेटिव्ह पॉझिटिव्ह चक्रव्युहात सामान्यांचा जीव टांगणीला

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

सध्या सर्वत्र करोनाच्या महामारीने थैमान घातले असून प्रत्येक गावात आणि शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक हवालदिल झाले आहेत. शासकीय लॅबमध्ये रिपोर्ट यायला आठ दिवस उशीर लागत असल्यामुळे खासगी लॅबला शासनाने परवानगी दिली. मात्र गेल्या काही दिवसातील त्यांचे अहवाल हे विश्वसनीय वाटत नसल्याने लोक संभ्रमात सापडले आहेत.

खासगी रुग्णालयात इलाज करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्याचबरोबर शासकीय अहवाल उशिरा येत असल्याने लोक खाजगी लॅबमध्ये स्त्राव चाचणी करीत आहेत. परंतु तेथून मिळणारे रिपोर्ट मात्र धक्कादायक असतात. कोणताही त्रास नसताना पॉझिटिव्ह अहवाल ही एक नित्याची बाब झाली आहे. मात्र असे अहवाल आले तरी लोकांनी घाबरून न जाता या करोनाचा मुकाबला करावा, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.

बरेचसे रुग्ण हे केवळ भीतीनेच गर्भगळीत होऊन मृत्यूला सामोरे जात आहेत. तेव्हा करोना रोगाची विनाकारण कोणीही भीती बाळगू नये. अहवाल जरी पॉझिटिव्ह आला तरी योग्य प्रकारे उपचार करून घ्यावेत. न घाबरता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये करोना रुग्ण सापडत असले तरी त्यांची नेमकी संख्या किती हा महत्त्वाचा प्रश्न गेले चार दिवस तालुक्यात चर्चिला जात आहे. कारण तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी या तिघांमध्ये कोणताही ताळमेळ नसल्याने तसेच खासगी अहवाल वेळेत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पोहोचत नसल्याने आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे. कोरोना रुग्णाच्या संख्येबाबत शहरात मोठ्या प्रमाणावर अफवांचे सुद्धा पीक आले असून या भागात दोन लोकांना कोरोना झाला, त्या भागात चार लोकांना कोरोना झाला अशा कपोलकल्पित चर्चा आहे.

नगरपालिकेमार्फत चालवले जाणारे नागरी आरोग्य केंद्र म्हणजे सरकारी दवाखाना ही सध्या शोभेची वस्तू बनली आहे. एकेकाळी नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याचा मोठा नावलौकिक होता. त्या ठिकाणी महिलांचे बाळंतपण, आवश्यक तपासण्या, छोटे ऑपरेशन केले जात होते. मात्र सध्या अशा कोणत्याही सुविधा येथे उपलब्ध नाही. फक्त लहान मुलांचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी होते. गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. मात्र शहरापासून लांब असल्याने बरेच लोक त्या ठिकाणी जाणे टाळतात. इतर प्रश्नांवर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आरडाओरडा करणारे नगरसेवक सरकारी दवाखान्याच्या प्रश्नावर मात्र गप्प आहेत. याबाबतही शहरातील जनतेत नाराजीची अशी भावना दिसून येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com