श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

केंद्र, राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय येथे काल करोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली.

आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना यावेळी लस देण्यात आली. काल प्राथमिक स्वरुपात आरोग्य विभागातील 99 जणांना करोना लसीकरण करण्यात आले.

गेल्या काही काळात शासनासह करोना योध्दे, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिक करोना प्रादूर्भावावर मात करण्यासाठी कार्यरत होते. या पार्श्वभूीवर करोना लसीकरण होत असल्यामुळे सर्वांच्या चेहर्यावर आनंद व समाधान दिसून येत होते. लसीकरणानंतर संबंधितांचे योग्य ते निरीक्षण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्क डॉ. वसंत जमधडे, डॉ. विनोद बंड, डॉ. कौस्तुभ शेवंते, डॉ. प्रशांत चव्हाण लसीकरणामध्ये सहभागी झाले होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

लसीकरण मोहिमेची सर्व तयारी आरोग्य प्रशासनाने पूर्ण केली असल्याची व त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंत जमधाडे यांनी दिली. संबंधित लसटोचक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. काही लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते यावेळी लसीकरण करण्यात आले.

लसीकरण मोहिमेतील या पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे. करोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे लसीकरणादरम्यान पालन करण्यात आले. लसीकरण झाल्यावरही मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.