श्रीरामपुरात पुन्हा 12 करोनाबाधित रुग्ण
सार्वमत

श्रीरामपुरात पुन्हा 12 करोनाबाधित रुग्ण

बेलापूर, शिरसगाव प्रत्येकी एक; शहरात 10 जणांचा समावेश

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

तालुक्यात काल पुन्हा 12 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात बेलापूर व शिरसगाव येथील प्रत्येकी एक तर शहरातील दहा जणांचा समावेश आहे. दरम्यान ‘त्या’ पॉझिटिव्ह नर्सच्या संपर्कात आलेल्या 9 आशा सेविकांसह 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

काल पॉझिटिव्ह आढळून आलेल्यामध्ये नेवासा रोड, उदय हॉटेल मागील एक तरुण, प्रवरा हौसिंग सोसायटीमधील एक महिला तसेच कर्मवीर पुतळा परिसरातील एका डॉक्टरच्या कुटुंबातील चार जण, वॉर्ड नं. 2 मधील कुरेशी मोहल्ला येथील करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील चार जण तर बेलापूर व शिरसगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नगर येथून पोलीस बंदोबस्तासाठी श्रीरामपुरात आलेल्या नगर येथील पोलीस कॉन्स्टेबलचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान वॉर्ड नं. 2 मधील मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ’त्या’ नर्सचा स्त्राव तपासल्यानंतर तिला क्वारंटाईन करण्याऐवजी ती ड्युटीवर होती. यावेळेस तिने अनेक लहान मुलांना लसीकरण केले होते तसेच अनेक आशा सेविका व कर्मचारी स्टाफबरोबर तिचा संपर्क आला होता. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले होते. या सर्व 21 जणांचे स्त्राव घेण्यात आले होते. यातील या अहवालात 9 आशा सेविकांसह 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यात 84 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 314 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 558 जणांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. 142 जणांचे अहवाल पेंडींग आहेत. 76 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सारीचे 18 रुग्ण असून आतापर्यंत तालुक्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

काल सकाळी आलेल्या करोना अहवालात बेलापूरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याने 12 दिवसांपूर्वी स्त्राव तपासणीसाठी दिले होते. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता त्याची पुन्हा रॅपीड टेस्ट केली. त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या दोन्ही तपासणी अहवालात तफावत आढळून आली आहे. याबाबत तहसीलदारांकडे वैद्यकीय अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

-सुनील मुथ्था, सामाजिक कार्यकर्ते, बेलापूर.

Deshdoot
www.deshdoot.com