खुशखबर..श्रीरामपूर करोनामुक्तीच्या दिशेने !

दोन दिवसांत एकही रूग्ण नाही, 26 जणांवर उपचार सुरू
खुशखबर..श्रीरामपूर करोनामुक्तीच्या दिशेने !

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यातील जनतेला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन दिवस एकही रुग्ण आढळून आला नाही.

तालुक्यात अवघे 30 करोनाचे रुग्ण उपचार घेत होते. त्यात करोनातून बरे होऊन 4 जण घरी परतले आहेत.

एका काळ असा होता की, श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अनेक गावात करोनाने धुमाकूळ घातला होता. अनेक दवाखाने फुल्ल होते. श्रीरामपूर तालुक्यात एक़ा दिवसांत400 ते 457 रुग्ण आढळत होते. त्यावेळी तालुक्यात काय जिल्ह्यातही रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नव्हती. त्यावेळी रुग्णांना नगरसह औरंगाबाद, पुणे, व नाशिकचा आधार घ्यावा लागला होता. रेमडेसिवीर घेतल्याशिवाय करोना बरा होणार नाही असा समज झाल्याने या इंजेक्शन मिळविण्यासाठी अनेकांना वणवण करावी लागली.

अनेकांनी 15 ते 35 हजारांपर्यंत हे इंजेक्शन या ना त्या मार्गाने मिळविले. पण या इंजेक्शनचे साईड इफेक्टही अनेकांना भोगावे लागले व अजूनही लागत आहे. या सर्व प्रकारांमुळे सर्वजण हादरून गेले होते. ही भयावह परिस्थिती पाहून शहरासह तालुक्यातील गावांगावात हा आजार नियंत्रणात यावा यासाठी लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. करोनाची एवढी दहशत होती की, कुणी कुणाच्या घरी जात नव्हते. विवाह सोहळे आणि दशक्रिया विधी मोजक्या लोकांमध्ये होण्यास सुरूवात झाली. वाढदिवस, सण साधेपणाने झाले. आठवडे बाजारही बंद झाले.

करोनाच्या दहशतींमुळे शाळा ओस पडल्या. करोनाच्या महामारीच्या काळात श्रीरामपूरांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. मात्र, श्रीरामपूरातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट पाहायला मिळतंय. दोन दिवसांत तर एकही रूग्ण आढळला नाही.

डॉक्टर, प्रशासन, अधिकार्‍यांची सतर्कता आणि व्यापारी, जनतेने घेतलेली काळजी, झालेले लसीकरण यामुळे गत काही दिवसांपासून दैनदिन रूग्णांच्या संख्येत घट झाल्याने बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत. मंदिरं, शाळा सुरू आहेत. चित्रपटगृहे चालू आहेत. विवाह सोहळेही दणक्यात पार पडू लागले आहेत. जिल्ह्यात श्रीरामपूरसह जामखेड, अकोले या तालुक्यातंमध्येही नवीन करोना रुग्णांची संख्या 00 अशी आहे.

357 जणांचा मृत्यू

आतापर्यंत करोनाने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील तब्बल 357 जणांचा बळी घेतला. त्यामुळे अनेक घरातील कर्ता माणूस गेल्याने या कुटुंबावर संकट ओढावले आहे.

Related Stories

No stories found.