corona
corona
सार्वमत

श्रीरामपुरात ठेकेदार पॉझिटिव्ह

13 निगेटिव्ह व अभियंत्याच्या कुटुंबातील चौघे घरी परतले

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहरात काल पुन्हा एका ठेकेदाराचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यात 13 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून चारजण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे अद्यापही 24 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांचा आकडा आता 43 वर जावून पोहोचला आहे.

श्रीरामपूरात करोना संसर्गाची साखळी अजूनही खंडित झालेली नाही. काल केवळ एकच रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मात्र या रुग्णाने त्याचा मोबाईल नंबर व पत्ता खोटा दिल्यामुळे हा रुग्ण कुठला आहे याची माहिती मिळण्यास प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. चौकशीनंतर ही व्यक्ती ठेकेदार असल्याची माहिती असून तो वॉर्ड न. 7 मधील दळवी वस्ती परिसरात राहत असल्याचे समजले.

आज आलेल्या करोना अहवालापैकी 13 अहवाल हे निगेटीव्ह आले आहे. तर श्रीरामपूर येथील वीज वितरण अधिकार्‍यांच्या घरातील सात जणांचे अहवाल अहवाल पॉझिटीव्ह आले होते यातील चौघांची तब्बेत चांगली झाली असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहेत.

अजूनही स्त्राव घेण्याचे काम सुरु असून येथील संतलुट हॉस्पिटलमध्ये करोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. 43 पैकी चार जण बरे झाल्याने आता 39 जणांवर उपचार सुरु आहेत. निगेटीव्ही अहवालात वॉर्ड नं. 2 मधील काही, भोकर व टाकळीभान येथील काही जणांना दिलासा मिळाला आहे.

या ठेकेदाराच्या मुलीचा विवाह येथील एका मंगल कार्यालयात नुकताच झाला होता. त्या विवाहासाठी जळगावचे वर्‍हाडी आले होते. त्यानंतरच या व्यक्तीला त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर या व्यक्तीचा स्त्राव तपासणीसाठी पाठविला असता तो करोना पॉझिटिव्ह आला.

Deshdoot
www.deshdoot.com