श्रीरामपूर मतदारसंघातील 32 गावच्या प्रश्नाचा आमदार कानडे यांनी घेतला आढावा

गैरहजर अधिकार्‍यांना नोटीस बजावणार; विविध विषयांवर चर्चा
श्रीरामपूर मतदारसंघातील 32 गावच्या प्रश्नाचा आमदार कानडे यांनी घेतला आढावा

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

श्रीरामपूर मतदारसंघातील देवळाली प्रवरासह प्रवराकाठच्या 32 गावांतील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी व त्यावरील समस्या जाणून घेण्यासाठी आ. लहू कानडे यांनी देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी संजय गांधी निराधार योजना, मासिक प्रगती अहवाल, श्रावण बाळ योजना, शिवरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे, गौण खनिज उत्खनन, त्यातून मिळणारा महसूल व अवैध उपशावरील कारवाई, पाणीपुरवठा योजना, पाईपलाईन गळती, लसीकरण, कोविड सेंटरवरील जमाखर्च, शाळा सुरू करण्याबाबतची दक्षता-उपाययोजना, तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था, पीक विमा योजना, कृषी सहाय्यकांची गावनिहाय पडताळणी, यासह अन्य विषयांचा आढावा घेण्यात आला.

प्रारंभी या आढावा बैठकीकडे पाठ फिरविणार्‍या संबंधित अधिकार्‍यांना नोटिसा काढण्याचे आदेश आ. कानडे यांनी नायब तहसीलदारांना दिले. विषय पत्रिका नसल्याने आ. कानडे यांचा पारा वाढला. त्यांनी नायब तहसीलदारांना खडेबोल सुनावले. पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाचा आठ कोटींचा निधी अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे परत गेल्याचा आरोप आ. कानडे यांनी केला. जलजीवन योजनेंतर्गत 32 गावातील प्रत्येक वाड्यावस्तीवर जाऊन सरपंच व ग्रामसेवकांना बरोबर घेऊन याबाबत तातडीने सर्वे करून प्रत्येकाच्या घरी पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन कसे जाईल? यावर कारवाई करण्याचे आदेश अधिकार्‍यांंना देण्यात आले.

जुन्या झालेल्या पाईपलाईनची दुरूस्ती अथवा बदलून त्या सुस्थितीत आणण्याच्या सूचना दिल्या. मुसळवाडी पाणीयोजनेसंदर्भात मंत्र्यांनी आदेश देऊनही सर्वे का झाला नाही? याबाबत अधिकार्‍यांना आ. कानडे यांनी कारणे देण्याच्या सूचना केल्या. श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, लोककल्याणकारी योजनांची किती प्रकरणे प्रलंबित आहेत? ती नामंजूर का झाली? याबाबत सविस्तर माहिती घेऊन महसूल अधिकार्‍यांची दि. 24 जुलै रोजी बैठक घेणार असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.

राहुरी तालुुक्यातील वाळू, मुरूम, लिलावातून किती महसूल मिळाला? आतापर्यंत अवैध उत्खननावर काय कारवाई झाली? त्याचा अहवाल त्यांनी मागितला. मुसळवाडी पाणीयोजनेसाठी मंत्र्यांनी पत्र देऊनही सर्वे का झाला नाही? याबाबतही विचारणा त्यांनी केली. करोनाच्या तिसर्‍या लाटेपूर्वी काय उपाययोजना केल्या? त्याची विचारणा आरोग्य अधिकार्‍यांकडे केली. देवळाली पालिकेच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करण्याबाबत सूचना केल्या. तसेच लहान मुलांना लसीकरणासंदर्भात राहुरी तालुक्यात अद्यापही सुरूवात का झाली नाही? असा सवाल करून वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना दूरध्वनीवरून विचारणा केली. त्यावर अधिकार्‍यांनी उद्यापासूनच लसीकरणाच्या सूचना दिल्या.

देवळाली प्रवरात शनिवारी रात्री पडलेल्या दरोड्याबाबत पोलीस निरीक्षक दुधाळ यांना आ. कानडे यांनी चांगलेच फैलावर घेतले. पोलिसांनी गुन्हेगारांवर आपला धाक निर्माण केला पाहिजे. असे आ. कानडे यांनी सुनावले. बैठकीस नायब तहसीलदार गणेश तळेकर, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, आरोग्य अधिकारी दिपाली गायकवाड, नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांंनी आमदारांच्या आढावा बैठकीकडे पाठ फिरविल्याने तहसीलदारांसह पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यावर काय कारवाई होणार? याकडे अधिकार्‍यांचे लक्ष वेधले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com