
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
राज्यासह जिल्ह्यात काँगे्रेसची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही. जिल्ह्यात केवळ दोनच आमदार निवडून आले आहेत. केवळ ससाणे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र लक्ष घातले म्हणून यावेळेस श्रीरामपुरात काँग्रेसचा आमदार निवडून आला. त्यांनी सध्या नसते उद्योग सुरू केले असून निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द न पाळता ऐनवेळी आम्हाला धोका देणार्यांना बरोबर घेऊन पालिका निवडणुकीत आमच्या विरोधात लढण्याची भाषा करत आहेत. असेच होत राहिले तर श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसची अवस्था खूपच बिकट होईल. त्यामुळे त्यांना आताच आवरा, असे साकडे काल कट्टर ससाणे समर्थकांनी आ. डॉ. सुधीर तांबे यांना घातले.
श्रीरामपुरात आयोजित एका कार्यक्रमात काल साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचीन गुजर, माजी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे,महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या महासचिव सौ. दीपाली ससाणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट निर्वाणीचा इशारा दिला. ते म्हणाले, गेल्या 25 वर्षापासून श्रीरामपूर तालुक्यात स्व. जयंतराव ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे वर्चस्व आहे. स्व. ससाणे स्वतः दहा वर्षे आमदार होते. त्यानंतर भाऊसाहेब कांबळे यांनी दहा वर्षे आमदार म्हणून राहिले तसेच आता सध्याचे आमदार लहू कानडे अडीच वर्षापासून काम पहात आहेत.
स्व. ससाणे यांच्या शेवटच्या काळात भाऊसाहेब कांबळे यांनी धोका दिला आणि पुढच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. स्व. ससाणे यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते सर्वसामान्य असून ते संघटीत आहेत. काहींनी स्व. ससाणे यांना धोका देऊन पालिका निवडणुकीनंतर ते ससाणे गटातून बाहेर पडले. ऐन संकटाच्या काळात स्व. ससाणे यांना धोका देणारे त्यांना सोडून गेले. त्यामुळे मागील पाच वर्षात ससाणे गटाच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास झाला. षडयंत्र रचले,.विश्वासात घेतले जात नव्हते व परस्पर कामे उरकुन घेतली जात होती. त्यामुळे ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी अवस्था करण्यात आली.
आमदारकीचे तिकीट देताना मी केवळ आमदार म्हणून काम पाहिल नगरपालिका निवडणुकीत लक्ष घालणार नाही, असा शब्द लहू कानडे यांनी दिला होता. मात्र त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून आमच्या विरोधात कुरघोड्या सुरु केल्या. आमचा विश्वासघात करणार्या लोकांना बरोबर घेऊन नगरपालिका निवडणुकीत आमच्या विरोधात उतरण्याची भाषा ते करत आहेत. अशी भाषा वापरणार असाल तर श्रीरामपूर तालुक्यात काँगे्रसचे दोन गट होवून आपोआप या तालुक्यात काँग्रेस रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आताच यांना आवरा, अशी मागणी ससाणे समर्थकांनी केली.
चर्चा करून प्रश्न सोडवू - आ. डॉ. तांबे
या प्रश्नाला उत्तर देताना आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, घर आहे, घरात कुरबुरी सुरुच असतात. आ. बाळासाहेब थोरात, मी, तुम्ही तसेच आमदार कानडे यांना बरोबर घेऊन, चर्चा करुन व आपल्यात जे काही असेल ते मिटवून या चर्चेतून चांगला मार्ग काढू व श्रीरामपूर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवू,असे आ. डॉ. तांबे म्हणाले.