श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केटरोडवर महाविद्यालयीन तरुणांमध्ये हाणामारी

श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केटरोडवर महाविद्यालयीन तरुणांमध्ये हाणामारी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टोरीचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून बोरावके महाविद्यालयातील इ. 11 वीत शिकणार्‍या महाविद्यालयीन तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन महाविद्यालयीन तरुण जखमी झाले आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात परस्परविरुध्द फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी मोरगेवस्ती भागात राहणार्‍या इयत्ता 11 वीच्या एका विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मी बोरावके महाविद्यालयातील इ. 11 वी मध्ये शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी मी माझ्या मोबाईलच्या इन्स्ट्राग्रामला छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्टोरीचे स्टेटस ठेवले होते. तेव्हा मला एका तरुणाने तू तुझ्या मोबाईलच्या इन्स्ट्राग्रामला कोणतेही स्टेटस ठेवू नको, असे म्हणाला.तेव्हा मी त्यास म्हणालो की, हा माझा खासगी विषय आहे असे सांगून निघून गेलो. सदरचा तरुण हा कॉलेजचा तरुण नाही. परंतु मी व माझ्या मित्रासह महाविद्यालयातून घरी जात असताना कांदा मार्केट रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या तिघा चौघा जणांनी आपल्याला गाडी आडवी लावून त्यांच्याकडे असलेल्या बेल्टने आम्हाला पाठिवर व हातावर बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. तू आमच्या नादी लागला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह तीन अन्य तरुणांविरुध्द भादंवि कलम 143, 147, 323, 324, 504, 506, 341 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी फिर्याद नेवासारोड, भिमनगर, वॉर्ड नं. 6, श्रीरामपूर येथे राहणार्‍या मुलाने दिली आहे. हाही तरुण बोरावके महाविद्यालयात 12 वीत शिक्षण घेणारा आहे. त्याने फिर्यादीत म्हटले आहे की, आपण नेवासा रोडवरील मार्केट यार्ड येथून क्लासला गेलो असता परत येत असताना अंबिका पतसंस्थेजवळ दोघा जणांनी अडवून शिवीगाळ करून बेल्टने मारहाण केली. यात तरुण जखमी झाला असून त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तिघाजणांविरुध्द भादंवि कलम 143, 147, 323, 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com