श्रीरामपूर शहरात खुनाचा प्रयत्न करणारा जेरबंद

15 वर्षांनंतर पोलिसांना सापडला आरोपी
श्रीरामपूर शहरात खुनाचा प्रयत्न करणारा जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

15 वर्षांपासून दरोडा तयारी व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला. संजय नारायण फुगारे (रा. केडगाव, अहमदनगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ दमदाटीचा गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडून पसार आरोपींचा शोध सुरू आहे. शेवगाव पोलीस ठाण्यातील दरोडा तयारी गुन्ह्यात पसार आरोपी संजय फुगारे याच्याविषयी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंंगळे, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, भीमराज खर्से, देवेंद्र शेलार, दीपक शिंदे यांच्या पथकाने आरोपी फुगारे याला बोल्हेगाव उपनगरातील आंबेडकर चौक येथून ताब्यात घेतले. त्याने शेवगाव व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.

पोलिसांनी त्याला अटक करत शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com