श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात कोणीही याव आणि अतिक्रमण कराव हे खूपच सहज झाले आहे. या अतिक्रमणावर कोणाचाच वचक नाही.

यात राजकीय मंडळींनीच अतिक्रमणास परवानगी दिल्यामुळे श्रीरामपूर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. नगर जिल्ह्यात नाही असे फुटपाथ तयार केले होते; मात्र छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी हे फूटपाथ गिळंकृत करुन टाकले आहेत.

त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरुन चालणेही खूपच अवघड झाले आहे. शहरात सर्वत्र होत असलेल्या अतिक्रमणाला कोणी आवर घालणार का? नाही तर श्रीरामपूर शहर हे अतिक्रमणाचे शहर अशी ओळख होणार आहे.

जिल्ह्याचे ठिकाण अशी ओळख निर्माण करू पाहणार्या शहरातील हॉकर्स अन् दुकानदारांनी फुटपाथच गिळल्यामुळे मुख्य बाजारपेठेसह सुमारे 100 फुटांच्या मुख्य रस्त्यांचा श्वास अतिक्रमणामुळे कोंडत आहे. हा रस्ता आता केवळ नावालाच उरला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूची सुमारे 8 ते 10 फुट जागा अतिक्रमणात आणि वाहन तळातच गुंतली असल्याने त्याचा आकार घटून हा रास्ता 50 फुट झाला आहे.

कळस म्हणजे या रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहने पार्क केली जातात. शहरात कोणत्याही व्यावसायिक, दुकानदाराकडे अधिकृत वाहन तळच (पार्किंग) नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी, पायी चालताना लहान-मोठे अपघात ही शहरातील रस्त्यांवर नित्याचीच बाब झाली आहे.

गोंधवणीत मुख्य रस्त्यावर अनेकांनी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी टपरीचे लोखंडी साचे तयार करुन जागा अडवल्या आहेत. यात राजकीय लोकांचाही सहभाग आहे. त्यामुळे पूर्ण मोकळी अशी गोंधवणीत आता श्वासही मोकळा घेता येत नाही. सरकारी जागांवर कंपाऊंड टाकले आहे. वॉर्ड नं. 2 मध्येही अतिक्रमण वाढले आहे. त्या अतिक्रमणाबाबत वारंवार सुचित करण्यात येवूनही बिनधातपणे कोणीच काही करु शकत नाही असे म्हणत अतिक्रमण वाढवले जात आहे.

शहरातील मेनरोड वरील महात्मा गांधी पुतळा ते थेट भगतसिंग चौक, पुढे बेलापूर रोड तसेच शिवाजी रोड तर गिरमे चौकापर्यंत रस्ता असून नसल्यासारखा आहे. प्रत्येक दुकांनांपुढे आडव्या तिडव्या स्वरुपात वाहने लावलेली असतात.

यासह श्रीराम मंदिर चौक, नेवासा रोड, संगमनेर रोड, मौलाना आझाद चौक, अशा अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या प्रमाणात कायम रहदारीचे हे रस्ते अतिक्रमण, वाहनतळ यांनी बळकावले आहे. शहरातील असे अनेक चौक हे नेहमीचे वर्दळीचे असून असलेले रस्ते केवळ अतिक्रमणाने विद्रुप झाले आहेत. या मार्गावरील फुटपाथवर दुकानदारांनी कठडे, जाळ्या, डेमो, फलक, टेबल व इतर वस्तू ठेऊन त्यांच्यावर ताबा घेतला आहे.

त्यामुळे पायी चालणार्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. शहरात शेकडो फेरीवाले, पथ विक्रेते आहेत. त्यात दुचाकी, कार, ऑटो, बस, ट्रकची भर पडते. बरेचदा वाहतुकीची कोंडी होते. कारण अगदी रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो.

शहरातील रस्त्यांवर असलेले अतिक्रमण काढण्या सोबतच फुटपाथ मोकळे करण्यासाठी पालिका आणि पोलिस प्रशासनाने अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम वेगाने हाती घ्यावी लागणार आहे.

पालिकेसह मिटके, नोपानी यांच्याकडून अपेक्षा

पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके आणि श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे परिवीक्षाधीन अधिकारी आयुष नोपानी यांच्याकडून शहरातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. तरीही अजून वेळ गेलेली नाही. सर्वच बाबतीत या अधिकार्यांना यापुढे कर्तव्य सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. सुरक्षित वाहतूक, अतिक्रमण, अवैध प्रवासी वाहतूक, वाहनतळ अशा अनेक बाबींचा त्यात समावेश आहे.