पथविक्रेत्यांसाठी विशेष पतपुरवठा सुविधा - मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे

पथविक्रेत्यांसाठी विशेष पतपुरवठा सुविधा - मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा श्रीरामपूर शहर पालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान विभागातर्फे राबविण्यात येत आहे. यासाठी पी.एम. स्वनिधी समितीची स्थापना केल्याची माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.

सदर बैठकीला नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे तसेच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एस. एम. वालावकर तसेच पथविक्रेता समिती सदस्य राहीन शेख, बाजार विभाग अधिकारी सोफिया बागल, पथविक्रेता समिती सदस्य दिपक परदेशी, अमिन बेग मिर्झा, एन. बी. एफ. सी. प्रतिनिधी देविदास चव्हाण, वस्तीस्तर संघ प्रतिनिधी मंगल लोळगे, शहरस्तर संघ प्रतिनिधी संगिता वाघ, दीनदयााळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान विभागाचे व्यवस्थापक स्वाती निरगुडे, रेखा चाटे समुदाय संघटक वर्षा पाठक, हरिष पैठणे तसेच शहरातील विविध बँकाचे बँकर्स उपस्थित होते.

शहरातील भाजी-फळे, खाद्यपदार्थ, कापड, केस कर्तन, पानटपरी आदी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर करोना साथीमुळे उपजिविकेवर परिणाम झाला आहे. व्यवसाय पुन्हा सुरु होण्यासाठी खेळते भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी ही योजना राष्ट्रीयकृत बँक व वित्त संस्था यांच्या सहकार्यामुळे सुरु होत असल्याचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले.

पथविक्रेत्यांना राष्ट्रीयकृत बँक व सुक्ष्म वित्त संस्थेकडून 10 हजारापर्यंत खेळते भांडवली कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. नियमित परतफेड करणार्‍या पथविक्रेत्यांना 7 टक्के अनुदानित व्याज तीन महिन्याच्या अंतराने मिळणार आहे.

सदरील व्याज अनुदान हे 31 मार्च 2022 पर्यंत असेल. या योजनेत पथविक्रेत्यांच्या डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी 50 डिजिटल व्यवहार केल्यास 50 रुपये प्रमाणे कॅशबॅक मिळवता येईल. तरी या योजनेचा शहरातील सर्व नोंदणीकृत फेरीवाल्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद श्रीरामपूर मार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान कक्षातील समुदाय संघटक वर्षा पाठक/हरिष पैठणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com