
श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur
गेल्या दोन वर्षापसून श्रीरामपूर-हरेगाव, माळेवाडी व सराला गोवर्धनकडे जाणार्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आता करोना प्रादुर्भाव कमी झाला असून त्या पूर्ववत सुरु करण्यात याव्यात अशी मागणी हरिगाव येथील विद्यार्थी प्रतिनिधी सुशील शिणगारे यांनी पत्रकाव्दारे केली आहे.
बसेस बंद असल्याने विद्यार्थी, ज्येेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, नोकरीला जाणार्या अशा असंख्य नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालक दुप्पट तिप्पट भाडे आकारणी करून प्रवाशांची एक प्रकारे मोठी लुट करत आहेत. डिझेल पेट्रोलचे दर वाढले आहेत या नावाखाली मनमानी भाडे आकारले जात आहे. याकडे कोणी लक्ष घालताना दिसत नाही. करोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. आता एक वर्षापासून तिही सुरु झाली आहे. तरी बसेस धावल्या नाहीत, त्यातच एसटीचा संप झाल्याने मोठी गैरसोय झाली. बाहेरगावी जाणे अवघड झाले. श्रीरामपूर ते हरेगाव, उदिरगाव, माळेवाडी, गोवर्धन, नाऊर, वैजापूर या परिसरातील नागरिक श्रीरामपूरला येत असतात. त्यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे.
येथील आगारातून टाकळीभान, वाकडी, मातापूर, निमगाव खैरी या मार्गावरील बसेस सुरु आहेत. मात्र हरेगाव वगळण्यात आले आहे. हरिगाव भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हरेगाव, उंदीरगाव ते श्रीरामपूर रिक्षाभाडे 30 ते 40 रुपये प्रति विद्यार्थी, प्रवासी घेतले जाते. श्रीरामपूर डेपोकडे 50 बसेस आहेत. काही माल वाहतुकीसाठी केल्या आहेत. हे कारण योग्य नाही. डेपो व्यवस्थापक यांनी जादा बसेसची मागणी करावी. याबाबत सुशील शिणगारे यांनी बोरावके महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देऊन डेपो व्यवस्थापक यांना पत्र देण्याची मागणी केली. तसे पत्र विभागाला देण्यात आले असून महामंडळाने हरेगाव भागात बसेस सुरु कराव्यात, अशी मागणी शिणगारे यांनी केली आहे.