
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील वॉर्ड नं. 7 मधील साईश्रध्दा कॉलनीत असलेल्या एका बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा साडेतीन लाखाचा ऐवज लांबविला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7 मधील साईश्रध्दा कॉलनीत राहणारे संजय सर्जेराव भोसले हे त्यांच्या पत्नीला घेवून त्यांचा मित्र मच्छिंद्र शिंदे यांच्या मुलीच्या लग्नासाठी शहरात असलेल्या बुवा मंगल कार्यालयात त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून गेले होते. संध्याकाळी लग्न आटोपून संजय साळवे हे घरी आले असता तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा उघडलेला होता. कपाटाचे लॉक तोडून त्यातील साहित्य फेकून दिले होते.
याप्रकरणी त्यांनी तातडीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा करुन सदर घटनेची माहिती घेतली. अज्ञात चोरट्यांनी या घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटाचे लॉक तोडून कपाटात असलेले 90 हजार रुपये किंमतीचे तीन तोळे सोन्याची पोत, 90 हजार रुपये किंमतीच्या तीन तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, 60 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे सोन्याचे लगड, 60 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे सोन्याचे कानातील फुले,तसेच 40 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत संजय सर्जेराव भोसले यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा रजि. नं. 1131/2022 प्रमाणे भादंवि कलम 454, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे हे करत आहेत.