
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर दोन भागातील बजरंग चौक परिसरामध्ये असणार्या नवी दिल्ली व सनी चौक येथील एकाच गल्लीमधील 8 घरे फोडण्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. या सर्व घरफोड्यांमध्ये 29 हजार 716 रुपयांचा ऐवज चोरीला गेलेला असून एकूण सात घरे व एक किराणा दुकान चोरट्यांनी फोडले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वॉर्ड क्रमांक दोन येथील नवी दिल्ली व सनी चौक परिसरात काल रात्रीच्या सुमारास चैतन्य विकास बोरसे यांच्या किराणा दुकानासह शब्बीर मोहम्मद पठाण, माया केरू साळवे, तसत्वर उस्मान पठाण, रफिक युसूफ शहा, जमिला लतीफ पिंजारी यांच्या घरातून व समोरून घरगुती वापराच्या वस्तू चोरून नेल्या. त्यात पितळी हांडे, पलंग, गायछापचे पुडे अशा वस्तूंचा समावेश असून एकूण 29 हजार 716 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घरफोडी या परिसरातीलच काही जणांनी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून लवकरच त्या सर्वांना जेरबंद करू, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.