श्रीरामपूर भाजप तालुकाध्यक्षपद निवडीवरून वाद
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
भाजपा श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी दिपक पटारे यांची निवड जाहीर होताच यापूर्वीचे तालुकाध्यक्ष बबन मुठे यांनी सदरची निवड प्रक्रिया ही मान्य नसल्याचे सांगून या निवडीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजपा तालुकाध्यक्षपदी निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष गोंदकर व आ. विखे यांच्या उपस्थितीत माजी सभापती दीपक पटारे यांना प्रदान करण्यात आले. दरम्यान तालुक्यातील भाजपाच्या सर्व तालुका आघाडी बरखास्त केल्याचे मुठे यांनी जाहीर केले आहे. त्याचदरम्यान जिल्हाध्यक्षांनी मुठे यांना दोन पदावर निवडीचे पत्र बहाल करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
श्रीरामपूर भाजपा तालुकाध्यक्षपदी भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पटारे यांची निवड केली असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्याकडून जाहीर करण्यात आले. या निवडीनंतर मावळते तालुकाध्यक्ष बबन मुठे यांनी सांगितले की, मी अद्याप तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नसताना मला विश्वासात न घेता नवीन निवड केली असून ते मान्य नसल्याचे सांगत त्यांनी या नवीन निवडीवर आक्षेप घेतला आहे.
श्रीरामपूर भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी नवीन निवड झाल्याने माझ्या कार्य काळातील तालुका कार्यकारिणीतील सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिवसह कार्यकिारणीतील सदस्य, तालुका आघाडीतील भाजप युवा मोर्चा, महीला आघाडी, किसान मोर्चा, दलीत आघाडी, भटक्या जाती मोर्चा, ओबीसी, मोर्चासह कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती मुठे यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी बबन मुठे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना प्रथम जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिले त्यानंतर दुसर्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक समन्वयकपदी निवड केल्याचे पत्र दिले आहे, मात्र त्यातून मुठे यांची नाराजी दूर झाल्याचे दिसत नाही.
श्रीरामपूर तालुक्यात भाजपाचे वेगवेगळे तीन-चार गट आहेत. आणि त्यात आ. राधाकृष्ण विखे पा. हे श्रीरामपूर तालुक्यात आपले प्राबल्य वाढविण्याच्या दृष्टीने त्यांचे कट्टर समर्थक दिपक पटारे यांच्या गळ्यात तालुकाध्यक्षपदाची माळ टाकली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची मानली जात असली तरी या निवडीमुळे श्रीरामपूर तालुक्यातील भाजपा मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे मला माहितही नव्हते. आ. विखे हे भाजपात असल्याने ते जी जबाबदारी देतील ती मी घेण्यास तयार आहे. तालुकाध्यक्षपद निवडीचे पत्र नुकतेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व आ.राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते मिळालेले आहे. पद असो वा नसो एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार आहे.
- श्री. दिपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी मला काहीही न सांगता तसेच विश्वासात न घेता नवीन तालुकाध्यक्षपदाची निवड केली. तसेच मला जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक समन्वयकपदी निवड केल्याचे पत्र दिले. मला भाजपा कार्यकारिणीत योग्य ते पद जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी पदावर काम करणार नाही, केवळ एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे.
- श्री. बबन मुठे, मावळते भाजपा तालुकाध्यक्ष