
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
श्रीरामपूर शहर व तालुक्यात दोन अकस्मात मृत्यूच्या घटना घडल्या. शहरातील मोरगेवस्ती परिसरातील एकाने गळफास घेत आत्महत्या केली तर तालुक्यातील भेर्डापूर येथील एकाचा दवाखान्यात उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
शहरातील वॉर्ड क्र. ७, मोरगेवस्ती परिसरातील बंडू तात्याबा काळे (वय ४४) यांनी राहत्या घरात गळफास घेतला. त्यांच्या नातेवाईकांनी काळे यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी काळे मयत झाल्याची खबर शहर पोलिसांत दिली. त्यावरुन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काळे यांचा वायरिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, बहिण, भाऊ, वडील असा परिवार आहे. काळे यांनी नेमका कोणत्या कारणाने गळफास घेतला? याबाबत पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. जाधव पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत भेर्डापूर येथील दत्तात्रय विलास पवार (वय ३५) या तरुणाला त्याच्या नातेवाईकांनी शहरातील संजीवन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासले असता दत्तात्रय पवार याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी तशी खबर श्रीरामपूर तालुका पोलिसांत दिल्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बर्डे करीत आहेत