श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर ते बेलापूर रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करणार्या टपरीधारक दुकानदारांना तसेच रहिवाश्यांना काल सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

15 दिवसांच्या आत अतिक्रमणे न काढल्यास सदर अतिक्रमण काढून साहित्य बांधकाम खात्यांमध्ये जमा केले जाईल, असा इशारा नोटिशीमध्ये देण्यात आला आहे. या नोटिसा मिळाल्याने या अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

हा राज्यमार्ग क्रमांक 36 असून कोपरगाव ते राहुरी फॅक्टरी या मार्गावरील हा रस्ता चौपदरी होत आहे. त्यासाठी श्रीरामपूर वेशीपासून दोन किलोमिटरच्या रस्त्यासाठी विशेष दुरुस्ती निधीतून सहा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. पहिल्या टप्प्यात श्रीरामपूर ऐनतपूर हद्दीपासून दोन किलोमीटर रस्ता चौपदरी केला जाणार आहे.

मार्च महिन्यात या रस्त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या मार्गावर रस्त्याच्या दोन्हीही बाजूने मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवार दि.22 पासून नोटीस बजावण्यास सुरुवात केली असून अतिकमणधारकांना 15 दिवसांचा ‘अल्टीमेटम’ दिला आहे.

कोपरगाव-पुणतांबा श्रीरामपूर-बेलापूर-देवळाली प्रवरा-राहुरी फॅक्टरी असा राज्यमार्ग 36 या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना तसेच टपरीधारकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर अंतरावर सरकारी जागेत ही अतिक्रमणे आहे. सदर सरकारी जागेत अतिक्रमण अधिनियम 1955 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1969 व केंद्र शासन भूपृष्ठ मंत्रालय दि. 13.1.1977 अन्वये रिबन डेव्हलपमेंट नियमाचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

तरी सदर अतिक्रमण धारकांनी ही नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत आपले अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा सरकारी खर्चाने अतिक्रमण काढले जाईल व सदर काढलेल्या अतिक्रमणात निघणारे साहित्य सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गोडावूनमध्ये जमा केले जाईल व त्यासाठी येणारा खर्च आपणाकडून वसूल केला जाईल, तरी याची गंभीर दखल घ्यावी व त्वरित अतिक्रमण काढावे, असे शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूर यांनी काढलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

काल रस्त्याच्या पूर्व भागातील 400 मिटर अंतरावरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून उर्वरित नोटिसा आज (मंगळवार) बजावण्यात येणार आहे. पूर्व भागातील नोटिसा बजावण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यापासून पश्चिम भागातील 15 मिटर अंतरात अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना या नोटिसा आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.