आजच्या श्रीरामपूर बंदबाबत व्यापार्‍यांमध्ये मतभेद
सार्वमत

आजच्या श्रीरामपूर बंदबाबत व्यापार्‍यांमध्ये मतभेद

एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप ; स्वयंस्फूर्तीने बंदचा निर्णय घेतल्याचा व्यापारी असो. चा दावा

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनने आज गुरुवार दि. 9 जुलैपासून पुकारलेल्या चार दिवस श्रीरामपूर बंदला शहरातील काही व्यापार्‍यांनी एकतर्फी निर्णयाचा आरोप करून विरोध केला आहे. या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे फलकही शहरात लावले आहेत. तर व्यापारी असो. ने व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने बंदचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार्‍यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बंद ठेवणे हा एक चांगला उपाय असल्याचा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत विषय झाला. याअगोदरही दर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला आणि व्यापार्‍यांनी काही अंशी प्रतिसादही दिला.

शहरातील वॉर्ड नं. 2 व अन्य भागात करोनाचे रुग्ण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येऊन चार दिवस श्रीरामपूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हा निर्णय शहरातील काही व्यापार्‍यांना रुचला नाही. त्यांनी या निर्णयाला उघडउघड विरोध करून शहरातील मुख्य चौकात फलक लावून आमचा बंदला पाठिंबा नाही आणि व्यवसाय सुरुच ठेवणार असल्याचे जाहीर केले.

अशाप्रकारे चार दिवस बंद ठेवून करोनाची साखळी तुटली जाणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बंद ठेवणे हाच एक पर्याय आहे का? त्यावर प्रशासनाने कडक नियम लावून कडक निर्बंध ठेवल्यास नागरिकांवर त्याचा परिणाम होणार नाही का? अगोदरच चार महिने वेगवेगळ्या प्रकारचे लॉकडाऊन घेण्यात आले.

यात लहान मोठ्या सर्वच व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटल्यामुळे व्यापारी आता बंद ठेवण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्याचमुळे काही व्यापार्‍यांनी या बंदला विरोध दर्शविला आहे.

व्यावसायिक आता आर्थिक स्तर बरोबरीवर आणण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा बंद करणे म्हणजे आणखी उद्योग व्यवसायावर कुर्‍हाड मारण्यासारखे आहे, असे बंदला विरोध करणार्‍या व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. तर करोनाची साखळी तोडायची असेल तर बंद शिवाय पर्याय नाही असे सांगून व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या बंदच्या निर्णयाचे काहींनी स्वागत केले आहे.

करोनाला थोपवायचे असेल तर नागरिकांचा सतत सुरु असलेला वावर तो थांबला पाहिजे. जोपर्यंत ही साखळी तुटणार नाही तोपर्यंत करोनाला आळा बसू शकणार नाही. सध्या श्रीरामपूर शहरात वाढत असलेला करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व्यापारी असो. ने जे बंदचे आवाहन केले आहे त्यात नागरिकांनी सहभागी होऊन चार दिवस स्वयंस्फूर्तीने बंद पाळावा. सर्वांनी घरी सुरक्षीत रहा.

- अनुराधा आदिक, नगराध्यक्षा, श्रीरामपूर नगरपरिषद

करोनाला थोपविण्यासाठी व्यापारी मर्चंटचा नेहमीच प्रयत्न आहे. मागील काळात करोना थोपविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे करोना आटोक्यात येऊ शकला. सध्या करोनाचे रुग्ण श्रीरामपुरात वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा चार चार दिवस बंद ठेवून यावर आळा घालण्याचा प्रयत्न आहे. व्यापारी असो. ने बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कोणावर लादलेला नाही किंवा सक्तीचा बंद नाही.

- राहुल रमण मुथ्था संचालक, व्यापारी मचर्ंट असो.

श्रीरामपूर शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनने श्रीरामपूर बंदचे आवाहन केले आहे. मात्र काही ज्यांचा व्यापाराशी कोणताही संबध नाही अशी मंडळी प्रसिध्दीच्या हव्यासापोटी बंदमध्ये सर्व व्यापारी सहभागी नसल्याचे सांगून हा बंद हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी व्यापारी वर्गाने अशा विघ्नसंतोषींकडे लक्ष न देता या चार दिवसांच्या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे.

- अनिल भनगडे भाजपा, माजी तालुकाध्यक्ष.

करोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी असो. ने श्रीरामपूर शहर चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तो एकतर्फी निर्णय घेतला आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना सोबत घेऊन निर्णय घेतला असता तर तो सर्वसमावेशक असा निर्णय ठरला असता. सध्या सर्वच व्यापारी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे बंद हाच एकमेव पर्याय नसून त्यासाठी सर्वांची मते जाणून घेणे गरजेचे होते.

- किरण लुणिया नगरसेवक, श्रीरामपूर

व्यापारी असो. ने बंदचा निर्णय व्यावसायिकांना विश्वासात घेऊन घेतला पाहिजे होता. शहरात आज चार ते पाच हजार लहान मोठे व्यावसायिक आहेत. यात मर्चंट्सचे केवळ 200 ते 250 सभासद आहेत.तेच श्रीरामपूरला वेठीस का धरत आहेत. यात काहींचे उद्योग नाहीत तेच लोक बंदचा घाट घालत असतात. शहर चार दिवस बंद ठेवून करोनाला आळा बसणार आहे का? आम्हाला असे बंद मान्य नाहीत आणि आम्ही सहभागी होणार नाही.

- अशोक उपाध्ये व्यावसायिक, श्रीरामपूर

करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व्यापारी मर्चंट असोसिएशनने श्रीरामपूर बंदचे आवाहन केले आहे. जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे. यात प्रशासनाचा कोणताही संबंध नाही. प्रशासनाने कोणतेही बंदचे आवाहन केलेले नाही. केवळ वॉर्ड नं. 2 कंटेन्टमेंट झोन जाहीर केला आहे. करोनाची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेवून जबाबदारीने वागावे. सर्व नियम व घातलेले निर्बध पाळावेत.

- प्रशांत पाटील तहसीलदार, श्रीरामपूर

Deshdoot
www.deshdoot.com