टाकळीभान उपबाजारात दुकान गाळ्यांचा जाहीर लिलाव

गाळा घेण्यासाठीची रस्सीखेच बाजार समितीच्या पथ्यावर
टाकळीभान उपबाजारात दुकान गाळ्यांचा जाहीर लिलाव

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shrirampur Agricultural Produce Market Committee) टाकळीभान उपबाजारात (Taklibhan Sub Market) बाजार समितीच्यावतीने तरुणांना (Youth) व्यवसायासाठी संधी देण्यासाठी दुकान गाळे करार पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नुकत्याच नव्याने उभारण्यात आलेल्या 16 व्यापारी गाळ्यांचा जाहीर लिलावाप्रसंगी (Public Auction of Merchant Shops) दुकान गाळा घेण्यासाठी झालेली रस्सीखेच बाजार समितीच्या पथ्यावर पडली.

श्रीरामपूर बाजार समितीच्या (Shrirampur Agricultural Produce Market Committee) टाकळीभान उपबाजार समितीला (Taklibhan Sub Market) मोठ्या प्रमाणात जागा असल्याने दरवर्षी दुकान गाळे उभारून तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे बाजारपेठेसह उपबाजारचीही भरभराट होत आहे. उपबाजार आवारात नव्याने उभारण्यात आलेल्या 16 व्यापारी गाळ्यांचे काल जाहीर लिलाव (Auction) पध्दतीने उपसभापती नितीन भागडे यांच्या अध्यक्षतेखाली वाटप करण्यात आले. या लिलावात 43 इच्छुकांनी अनामत रक्कम रुपये 25 हजार भरून सहभाग नोंदवला होता.

यावेळी लिलाव बोलीत मोठी रस्सीखेच झाली. बाजार समितीची बोली दीड लाखांची असताना क्षेत्रफळानुसार 3 लाख 25 हजार ते 5 लाख 51 हजारापर्यंत जाहीर लिलाव झाला. यातून बाजार समितीला 63 लाख 12 हजारांचे उत्पन्न मिळाले. गाळेधारकांनी बोली लावलेली रक्कम ही बाजार समितीकडे अनामत बिनव्याजी ठेवली जाणार आहे. दरमहा 3 रुपये 50 पैसे स्क्वेअर फुटाप्रमाणे भाडे मोजावे लागणार आहे.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती नितीन भागडे, संचालक नानासाहेब पवार, सचिन गुजर, दीपक पटारे, मुक्ताजी फटांगरे, नितीन आसने, विश्वनाथ मुठे, कैलास बोर्डे, विलास दाभाडे, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार लिलाव बोलीसाठी ठाण मांडून होते. यावेळी उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

गेल्या काही वर्षांपासून टाकळीभान येथे दुकान गाळे हा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. शहरी भागापेक्षा अव्वाच्या सव्वा रकमा दुकान गाळ्यांसाठी मोजल्या जात आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकाला दुकान गाळा घेऊन व्यवसाय करणे त्याच्या अवाक्याबाहेर गेले आहे. मुख्य रस्त्यावरील 10 बाय 10 च्या दुकान गाळे विक्रीने किमतीचे रेकार्ड ब्रेक केले आहे. त्यामुळे दुकान गाळा घेण्यासाठी नेहमीच मोठी रस्सीखेच होत असल्याने शहरी भागापेक्षाही येथे दुकान गाळ्यांना माल मोजावा लागत आहे.

Related Stories

No stories found.