अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने घरातील एकटी माऊली नि:शब्द

नायगाव ग्रामस्थ व तरुणांनी दिला मदतीचा हात
अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने घरातील एकटी माऊली नि:शब्द

नाऊर |वार्ताहर| Naur

घरात पती-पत्नीसह चार मुली, एक मुलगा यामुळे घर कसे भरलेले होतेे. नंतर तीन मुलींचे लग्न झाले. काल शनिवारी बेलापूर रस्त्यावर झालेल्या अपघातात पती, मुलगा व मुलगी या तिघांचा एकाच वेळी मृत्यू झाला. घरात आता ती एकटी माउलीच राहिली. एका अपघाताने संपूर्ण कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे तिच्यावर जणू आभाळच कोसळले. या धक्क्याने ही माऊली नि:शब्द झाली आहे. नंदाबाई बाळासाहेब गायकवाड या आदिवासी महिलेवर नियतीने ही वेळ आणली. काल रात्री या मृतांवरील अंत्यसंस्काराच्यावेळी पोलीस कर्मचारी, अ‍ॅम्ब्युलन्स चालकासह नागरिकांचे डोळे पाणावले.

श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील काल मळीच्या टँकर आणि मोटारसायकल यांचा विचित्र अपघात झाला. या भिषण अपघातात नायगाव येथील आदिवासी समाजातील अतिशय गरीब कुटुंबातील बाळासाहेब गायकवाड, त्यांचा मुलगा अजित व मुलगी दीपाली या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने श्रीरामपूर तालुक्यासह गोदावरी नदीकाठच्या परिसरावर शोककळा पसरली. गायकवाड कुटुंब हे अतिशय गरीब व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब होते. मयत बाळासाहेब यांना 4 मुली व एकच मुलगा होता, तीन मुलींचा विवाह झालेला असून घरी पती-पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे हे कुटुंब होते.

सदर कुटुंब शेतातील मिळेल ते काम करायचे. मुलगा अजित श्रीरामपूर येथील फर्निचर मॉलमध्ये कामाला होता तर मुलगी दीपाली शिक्षणासह कामाला जायची. तिच्या लग्नासाठी खंडाळा येथील स्थळासाठी जमवाजमव सुरू असल्याचे समजते. मात्र काळाला ही गोष्ट मान्य नसावी, दुर्दैवाने त्या तिघांचा अपघातात करूण अंत झाला. काल रात्री 10 च्या सुमारास नायगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. मात्र घरातील सर्वच हरपल्याने बाळासाहेब यांची पत्नी नंदाबाई यांना शब्द फुटत नव्हते.

नायगाव येथील एका आदिवासी कुटुंबातील बाप, मुलगा आणि मुलगी अशा तिघांवर अंत्यविधी करण्याची अतिशय हृदयद्रावक वेळ कुटुंबात उरलेल्या माऊलीवर आली. त्या माऊलीच्या डोळ्याच्या पापण्यादेखील वरखाली होत नव्हत्या, तेथील परिस्थिती इतकी गंभीर होती की, सकाळी सर्व व्यवस्थित असताना एका अपघाताने संपूर्ण कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले. अपघाताने आभाळच रिकामे झाल्याने या माऊलीला शब्द फुटत नव्हते की हंबरडा फोडता येत नव्हता.

ती नि:शब्द होऊन बसली होती. ही परिस्थिती पाहून यावेळी उपस्थित पोलिस कर्मचारी, अ‍ॅम्ब्युलन्स चालकासह नागरिकांचेही डोळे पाणावले.गावातील तरुणांनी रुग्णवाहिकेसह दवाखाना व अंत्यविधीसाठी अवघ्या काही वेळातच 14 हजार रक्कम जमा करून अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. मृतांच्या दशक्रियाविधीचा खर्च देखील ग्रामस्थ व तरुण मंडळ करणार आहे.

घरकुलाचे स्वप्न राहिले अपूर्ण

मयत बाळासाहेब गायकवाड यांना घरकुल मंजूर झाले आहे. परंतु घरकुल बांधण्यापूर्वीच दुर्दैवाने या अपघातात घरातील तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न अपूर्णच राहिले. अपघातामुळे त्यांच्या पत्नी नंदाबाई यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. प्रशासनासह समाजातील प्रत्येक घटकाकडून त्यांना मदत होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com