श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवच्या दिवशी 681 जणांनी आपले

उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 279 जागेसाठी एकूण 1109 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला होता.

काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरतांना मोठा त्रास सहन करावा लागला. गेल्या दोन दिवसापासून ऑनलाईंन उमेदवारी अर्ज भरताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. अनेकवेळा वेबसाईड बंद पडत होती. त्यामुळे मुदतीच्या आत उमेदवारी अर्ज भरणे शक्य होणार नाही असे चित्र दिसत असताना उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली. तसेच अन्यथा ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.जिल्हाधिकार्यांनी शेवटी ऑफलाईनचा मार्ग मोकळा केला.

तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल तालुक्यात सर्वातिधक 83 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर सर्वात कमी अर्ज घुमनदेव, मातुलठाण या दोन ठिकाणी 7 अर्जच दाखल करण्यात आले आहे. उमेदवारी अर्जाची छाननी व माघार घेण्याच्या दिवसानंतरच खरेचित्र दिसून येणार आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये बर्याच जागा बिनविरोध होण्याची शक्यता दिसून येत आहे.

27 ग्रामपंचायतींपैकी टाकळीभान-32, बेलापूर बुद्रुक-83 निपाणीवडगाव-32, वडाळा महादेव-16, कारेगाव- 64, बेलापूर खुर्द-12, पढेगाव-60 गोंडेगाव-26, भेर्डापूर-13, लाडगाव-9, मालुंजा बुद्रुक-29, वळदगाव-19, खोकर-20, मुठेवडगाव-41, गळनिंब-14, ब्राम्हणगाव वेताळ-24, एक़लहरे-19, महांकाळवाडगाव-24, घुमनदेव-7, नायगाव-22, मातुलठाण-07, मांडवे-15, कुरणपूर-16, सराला-11, गोवर्धन-13, खानापूर-11, मातापूर-42 असे एकूण 681 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

काल शेवटच्या दिवशी तहसीलमध्ये गर्दी

काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात तोबा गर्दी झाली होती. तसेच गेली दोन दिवस इंटरनेट कॅफे व अन्य ठिकाणी उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरत असताना असंख्य अडचणी निर्माण झाल्या. अनेकांना आपले उमेदवारी अर्जच भरता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी ऑफलाईनचा पर्याय काढत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत होती ती वेळ संध्याकाळी 5.50 वाजेपर्यंत करण्यात आल्याने अनेकांनी ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी काल श्रीरागपूर तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. या गर्दीला अटकाव करण्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती.