भारताच्या अखंडता व एकात्मतेसाठीच इंदिराजींचे बलिदान- सबनीस

भारताच्या अखंडता व एकात्मतेसाठीच इंदिराजींचे बलिदान- सबनीस

संगमनेर | Sangamner| प्रतिनिधी

बँकांचे राष्ट्रीयीकरण, ऑपरेशन ब्लू स्टार सह बांगलादेशची निर्मिती करणार्‍या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर नेत्या होत्या. देशाच्या विकासात ‘इंदिरा पर्व’ अत्यंत महत्वाचे असून भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिराजींनी बलिदान दिले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.

अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील शक्तीस्थळ बागेत आयोजित अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, सौ. ललिताताई सबनीस, इंद्रजीत थोरात, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, आर. बी. राहणे, नवनाथ अरगडे, सिताराम राऊत, रामदास पा.वाघ, संपतराव गोडगे, विलास वर्पे, अभिजीत ढोले, मिलिंद कानवडे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

श्रीपाल सबनीस म्हणाले, इंदिराजींनी धर्मनिरपेक्ष समाजवादी भारताची पायाभरणी केली असून देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचा विसर होणे हा कृतघ्नपणा आहे. देशाच्या विकासात इंदिरा पर्व अत्यंत महत्त्वाचे असून हरितक्रांती, विज्ञान क्रांती, घडवणार्‍या इंदिराजींनी बँकांच्या राष्ट्रीयकरणासह बांगलादेशची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कणखर नेत्या म्हणून त्या गौरविल्या गेल्या. व्यक्तिगत जीवनातही अनेक संकटांना झेलत त्या पुढे आल्या. इंदिराजींचे स्मरण हे फक्त काँग्रेसने नव्हे तर संपूर्ण देशाने केले पाहिजे. तसेच 600 संस्थाने देशात विलगीकरणाचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. इंदिराजी व सरदार पटेल हे भारतीय निष्ठेचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले. मात्र सध्या दुर्दैवाने देशात धार्मिकतेचे राजकारण सुरू आहे. लोकशाही ही धार्मिकतेवर आधारित नसून सर्वधर्मसमभावावर आधारित आहे. धार्मिकतेचे राजकारण हे देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवणारे असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी जीवनात इंदिरा गांधी, सुभाष चंद्र बोस यांसह विविध राष्ट्रपुरुषांना आदर्श मानले. त्यांच्या प्रती कृतज्ञता असावी आणि त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे म्हणून अमृत उद्योग समूहात त्यांचे स्मारक उभे केले आहे. दिल्लीनंतर संगमनेर मध्ये शक्तिस्थळ हे येथील कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देत असते. याप्रसंगी विलास कवडे, शांताराम कढणे, विनोद हासे, मोहनराव करंजकर, तात्या कुटे, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, बाळासाहेब गायकवाड, निखिल पापडेजा, ऋतिक पावसे, शेखर सोसे आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर रामदास पा. वाघ यांनी आभार मानले.

भारत जोडो यात्रा ही भारतीयांची मने जोडणारी

काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून स्व.इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान दिले आहे. खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही लोकशाहीचा विचार व भारतीयांचे मने जोडण्यारी यात्रा असून या यात्रेचे राज्यातील नियोजन हे काँग्रेस नेते आमदार थोरातांवर असून त्यांच्या नेतृत्वाखाली इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे आणि यामध्ये लोकशाही वर विश्वास असणार्‍या संघटना, पक्ष सहभागी होत असल्याचा विश्वास सबनीस यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com