श्रीक्षेत्र ताहाराबादला ग्रामप्रदक्षिणा, छबिना मिरवणूक

आज गुरूवारी पहाटे पाऊलघडीचा सोहळा
श्रीक्षेत्र ताहाराबादला ग्रामप्रदक्षिणा, छबिना मिरवणूक

ताहाराबाद |वार्ताहर| Taharabad

श्रीसंतकवी महिपती महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज भक्तविजयाची जन्मभूमी असलेल्या प्रतिपंढरी श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे दि. 22 जुलै ते दि.28 जुलैपर्यंत ‘पांडुरंग महोत्सव’ मोठ्या हर्षउल्हासात संपन्न झाला. महाराष्ट्रातील लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या पांडुरंग महोत्सवाची सांगता आज दि.28 रोजी पाऊलघडीच्या कार्यक्रमाने होणार आहे.

प्राचीन काळापासून पाऊलघडीचा हा धार्मिक कार्यक्रम प्रतिपंढरीत महिपतींनी बांधलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात संपन्न होतो. श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती स्वयंभू आहे. इ.स.1790 पासून हा पांडुरंग महोत्सव संपन्न होतो. चतुर्दशीच्या पर्वणीत छबिना मिरवणूक, पूजा, नैवेद्य, आरती व पालखीची ग्रामप्रदक्षिणा आदी कार्यक्रम संपन्न झाले.

श्रीक्षेत्र ताहाराबादला पांडुरंग महोत्सवाची सांगता 7 लाख भाविकांच्या मांदियाळीत झाली. सरत्या आषाढसरींमध्ये प्रतिपंढरीतून पांडुरंगाचे गमन होऊन श्रावणाच्या पूर्वसंध्येला पांडुरंगाचे पंढरीत आगमन होते. महिपतींच्या पावनभूमीने अभिमंत्रित झालेल्या व हिरवाईने नटलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबादच्या माळरानावर जमलेली भाविकांची मांदियाळी, सभामंडपातील अखंडपणे सुरू असलेला हरिनामाचा आणि टाळमृदुंगाचा गजर, वार्‍याच्या लहरीबरोबर डोलणार्‍या भगव्या पताका अशा मंत्रमुग्ध वातावरणात पांडुरंग महोत्सवाची पाऊलघडीच्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे. श्रवणभक्तीत आकंठ बुडालेले भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

नवमीला पांडुरंगाचे प्रतिपंढरीत आगमन होते, त्यानंतर 6 दिवस भाविकांचा पाहूणचार घेऊन अमावस्येला पांडुरंग आपल्या पंढरीला प्रस्थान ठेवतात. माहिपतींचा निरोप घेऊन पांडुरंग चंद्रभागेतिरी जातात. ज्ञानोबा - तुकोबाचा जयघोष, गुलाल-बुक्का, हळदी- कुंकवाची उधळण, भाविकांची अपारश्रद्धेच्या साक्षीने पंढरीधीश परमात्मा रुक्मिणी मातेसह महिपतींचा निरोप घेतात. पांडुरंग परमात्म्याच्या पंढरीकडे प्रस्थान ठेवल्याच्या साक्षात पाऊलखुणा उमटल्यानंतर त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक व्याकुळ होतात.

पाऊलखुणांच्या दर्शनासाठी व पंढरीधाशाला निरोप देण्यासाठी भाविकांची महावारी भरली. विधीवत पूजा, अभिषेक, नैवेद्य, आरती व अखंडपणे भजन आदी धार्मिक कार्यक्रम होऊन पाऊलघडीच्या कार्यक्रमाने पांडुरंग महोत्सवाची सांगता होईल. देवभूमी व संतभूमी असलेल्या प्रतिपंढरीतून पंढरीधीश परतीचा प्रवास करताच भाविकांच्या मनाला हुरहुर लागते.

शालिवाहन शके 1712 श्रावण वद्य द्वादशीस, इ.स.1790 मध्ये मध्यान्ही महिपती महाराज पांडुरंगाच्या चरणी अनंतात विलीन झाले. त्यांचे समाधी वृंदावन श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे आहे. तेव्हापासून प्रतिपंढरीत पांडुरंग महिपतींच्या भेटीसाठी येतात. यालाच पांडुरंग महोत्सव असे म्हटले जाते. संत महिपतींच्या अपार श्रद्धेमुळे देवालाही संत भेटीसाठी यावे लागले. महिपतींच्या अंतरंगातच पांडुरंग असल्याची खूणगाठ भाविक बांधतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com