श्रीक्षेत्र देवगड येथील मंदिरे झाली भाविकांसाठी खुली

श्रीक्षेत्र देवगड येथील मंदिरे झाली भाविकांसाठी खुली

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

श्रीक्षेत्र देवगडची मंदिरे अखेर कालपासून खुली झाली. देवगड देवस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्याहस्ते सकाळी घंटानाद करत तसेच देवाचा गजर करत भगवान दत्तात्रेयांचे मंदिर, किसनगिरी बाबा समाधी मंदिर व इतर सर्व मंदिरे उघडण्यात आली.

देवगड येथे दररोज पाच हजार भाविकांना कोविड नियमांचे पालन करत दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती महंत भास्करगिरी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रसंगी भास्करगिरी महाराज म्हणाले, भगवंताने करोना या आजाराचे जगभरातून उच्चाटन करावे सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे खुली होत आहे यांचा आनंद होत आहे. सर्व शासकीय नियम पाळून भाविक दर्शनाचा मानसिक आनंद घेत आहेत.

आज जगदंबा नवरात्र उत्सव सुरू होत आहे देवी-देवतांच्या कृपेने या महामारीचे उच्चाटन होवो अशी प्रार्थना केली. सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत मंदिर खुली राहणार आहेत. घटस्थापनेचा पहिलाच दिवस तसेच गुरुवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. प्रसाद-फुलांची दुकाने सुरू झाली. व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. दर्शन सुरू झाल्याने शासकीय नियमांचे पालन करून भाविकांना सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

चंद्रकांत खैरे यांनी घेतले दर्शन

शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंदिर खुले झाल्यानंतर श्रीक्षेत्र देवगड येथील मंदिरांमध्ये दर्शन घेतले. त्यानंतर भास्करगिरी महाराजांचे दर्शन घेऊन चर्चा केली. यावेळी अ‍ॅड. आशुतोष डंख, राम विधाते, बजरंग विधाते, बाळासाहेब महाराज कानडे, चांगदेव साबळे आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करण्याची परवानगी दिली त्याबद्दल आनंद होत आहे. श्रीक्षेत्र देवगडला दर्शनासाठी भाविक हजारोंच्या संख्येने येतात, परंतु करोनामुळे अनेक महिन्यांपासून मंदिर बंद होते, आज मंदिर उघडल्यानंतर श्रीक्षेत्र देवगडला महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. येथील आध्यात्मिक शक्ती मनाला एक ऊर्जा प्राप्त करून देते.

-चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते

आध्यात्मिक शक्तीच्या बळावर व शासनाने आरोग्यविषयक घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्याने करोना नामशेष होईल यात कुठलीही शंका नाही. किसनगिरी बाबांचे समाधीस्थान, गुरुवर्य बाबाजींचे दर्शन हे जीवनात ऊर्जा तथा विश्वास देणारे क्षेत्र असल्याने आमच्यासह राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांतून येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.

- राम विधाते, भाविक, देवगड

Related Stories

No stories found.