
देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे आठ दिवस चाललेल्या श्री दत्त जयंती महोत्सवाची गुरुवार 8 डिसेंबर रोजी भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत सांगता झाली. गुरुवार असल्याने काल्याच्या किर्तनाच्या दिवशी लाखावर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.
ज्ञानसागर सभामंडपामध्ये झालेल्या काल्याच्या किर्तनात भास्करगिरी महाराज म्हणाले ,संतांची संगत घडली तर मानवाला सुख अणि सुखरुपता प्राप्त होते. मानवाच्या पारमार्थिक जीवनामध्ये संतसंग हा अत्यंत महत्त्वाचा अणि आवश्यक आहे. धार्मिक कार्यक्रम, सप्ताहातून संस्काराची शिकवण मिळते. भगवंतांच्या नामस्मरणाने मनुष्य सात्विक होतो. देवाचे कार्य करताना ते श्रद्धापूर्वक करत राहिले पाहिजे. श्रद्धेने केलेली भक्ती फलद्रुप होते असे स्पष्ट करतानाच प्रत्येक देवस्थानचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, असे आवाहन केले. दत्तजयंती महोत्सवाचा आनंद आपण श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपाछत्राखाली उपभोगला आहे. पारायण, किर्तनासह दत्त याग सारखे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानत धन्यवाद दिले.
देवगड येथील महाद्वार येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत भास्करगिरी महाराज यांनी काल्याची दहीहंडी फोडली. याप्रसंगी प्रकाशानंदगिरी महाराज यांचेसह हजारो वारकरी उपस्थित होते. दत्त जयंती सप्ताह काळात योगदान देणारे स्वयंसेवक, यात्रा कमेटी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, संत महंत, शाळेतील स्वयंसेवक, होमगार्ड आदी सर्व भक्त मंडळाचे महंत भास्करगिरी महाराज यांनी आभार व्यक्त केले.
आठ दिवस चाललेल्या दत्तजयंती सोहळ्यास केंद्रीय मंत्री भागवत कराड, माजी मंत्री शंकरराव गडाख, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनीताई विखे यांचेसह राज्यभरातील महाराज मंडळींनी सप्ताह काळात हजेरी लावली. किर्तनप्रसंगी गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे, मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, बजरंग विधाते, विणेकरी नारायण महाराज ससे, सरपंच अजय साबळे, भाऊसाहेब कोकणे, लक्ष्मण महाराज नांगरे, बाबासाहेब महाराज सातपुते, पंढरीनाथ महाराज मिस्तरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष भाविक उपस्थित होते.
पुस्तके आणल्यास उपयोगी पडतील...
काल्याच्या कीर्तनप्रसंगी अनेकांनी भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी यांचे संतपूजन केले. कीर्तन चालू असताना भाविकांनी मोठे हार, शाल, श्रीफळ आणले होते. यावेळी सर्वांचा सन्मान स्वीकारला मात्र भास्करगिरी महाराज म्हणाले की, हारा ऐवजी येणार्या भाविक व लहान मुलांना देण्यासाठी बिस्किट पुडे, पुस्तके आणल्यास ते उपयोगी पडतील. असे सांगताच उपस्थित भाविकांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.
शेती औजारांची लाखोंची विक्री
यात्रा महोत्सव काळात शेतकर्यांनी शेती औजार खरेदीस प्राधान्य दिले. देवगड येथे लाखो रुपयांच्या शेती औजारांची विक्री झाली. यात्रेत शेतकर्यांनी शेतीच्या कामासाठी लागणारे पेरणी यंत्र, दाताळे, टिकाव, खुरपे, फावडे, घमिले, ताडपत्री, कुर्हाड आदी वस्तूंची लाखो रुपयांची विक्री झाली. अनेक व्यापार्यांनी येथे आणलेल्या सर्व मालाची विक्री झाली.