
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा शहरातील शालेय, महाविद्यालयीन मुले नशेच्या आहारी गेली असून महाविद्यालये, बाजार समिती यासह विविध भागात या युवकांचे नशेचे अड्डे सुरू आहेत. हे रॅकेट तातडीने उद्ध्वस्त करावे अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना इशारा दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा शहरातील अनेक अल्पवयीन मुले नशेच्या आहारी गेली आहेत. लॉकडाऊननंतर पुणे शहरातून उच्च शिक्षणासाठी गेलेले काही विद्यार्थी श्रीगोंदा शहरात आले मात्र सोबत काही नशा करण्याचे वेगवेगळे प्रकार घेऊन आले आहेत. यामुळे श्रीगोंदा शहरातील अनेक उच्चभ्रू कुटुंबातील आठवी ते बारावीपर्यंतची मुले नशेच्या आहारी गेल्याची बाब आता समोर आली आहे.लाडाने वाढवलेली मुले असल्याने पालकांना मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन सहन करावा लागत आहे.
समाजात इज्जत जाईल या भीतीने कुणाला सांगताही येत नाही. तसेच पोलिसांना कळवता येत नाही. यापुर्वी हा सर्व प्रकार संभाजी ब्रिगेडने पोलीस निरीक्षक ढिकले यांना प्रत्यक्ष भेटून सांगितला होता. मात्र त्याचा योग्य तपास न झाल्याने कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. कुणाचाही वचक या नशेखोर तरुणाला राहिलेला नाही हे वास्तव आहे. ही मुले भविष्यात मोठे गुन्हे करू शकतात. त्यातून श्रीगोंदा शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था हा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास दिनांक 13 डिसेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन यांच्या दालनात आंदोलन करण्याची भूमिका भोस यांनी घेतली आहे. यावेळी वैभव मेथा उपस्थित होते.
या ठिकाणी अशी चालते नशा
श्रीगोंदा शहरातील लेंडी नाला भराव परिसर, आय टी आय, कॉलेजच्या पाठीमागे, खंडोबा मंदिर परिसर, लिंबू मार्केट परिसर, कांदा गोडाऊन परिसर, लिंबू मार्केट परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही मुले घोळका करून नशेचे इंजेक्शन, गोळ्या, पाण्याच्या बाटलीत गांजा टाकून ओढायचा हुक्का अशा प्रकारे नशा केली जात आहे.