साखर कारखान्यांच्या निवडणुकीत नागवडे, जगतापांची कसोटी
साखर कारखाना

साखर कारखान्यांच्या निवडणुकीत नागवडे, जगतापांची कसोटी

श्रीगोंद्याचे राजकारण ढवळून निघणार

श्रीगोंदा तालुका वार्तापत्र |शिवाजी साळुंके

श्रीगोंदा तालुक्यातील स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर (श्रीगोंदा ) कारखान्याच्या बरोबरच स्व.कुंडलीकराव जगताप पा.(कुकडी)सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे बिगुल वाजले असताना तालुक्यातील या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सध्याचे राजकीय वातावरण पाहता नागवडे कारखाना निवडणुकीत चेअरमन राजेंद्र नागवडे याना सत्ता राखताना आपल्याच एकेकाळीच्या सहकार्‍यांबरोबर संघर्ष करावा लागणार आहे. असे असताना दुसरीकडे मात्र माजी आमदार राहुल जगताप यांच्या कुकडी कारखाना निवडणुकीकडे त्यांच्या राजकीय विरोधकांनी अद्याप कुठली आघाडी घेतलेली दिसत नसल्याने पुन्हा एकदा राहुल जगताप करखान्याची सूत्रे आपल्याच हाती ठेवतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तालुक्यात दोन सहकारी साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. तर दोन खाजगी कारखान्यांमध्ये देवदैठणचा साईकृपाने (साजन शुगर) गाळप सुरू आहे. आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबाची भागीदारी असणारा साईकृपा इंटिग्रेटेडचे रुतलेल चाक मागील दोन चार वर्षांत रुळावर आलेले नसताना श्रीगोंदा सहकारी आणि कुकडी सहकारी या दोन्ही कारखान्यांत गाळप हंगामाच्या बरोबर पंचवार्षिक निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे.

स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर त्याचे चिरंजीव राजेंद्र नागवडे यांनी नागवडे सहकारी साखर कारखान्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. दरम्यान बापूंच्या बरोबर काम करणारे सहकारी केशवराव मगर यांनी मात्र विद्यमान व्हा.चेअरमन पदाचा राजीनामा देत राजेंद्र नागवडे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत नागवडे यांच्याविरोधात आघाडी उघाडली आहे .यात मगर यांना माजी जिल्ह्यापरिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे तसेच अनेक नाराजाची साथ मिळाली आहे. केशवराव मगर यांनी मागील एक वर्षापासून नागवडे कारखान्यामध्ये अंदाधुंद कारभार सुरू असल्याचे आरोप करत राजेंद्र नागवडे यांच्या कारभाराबाबत धुराळा उडवत आहेत. प्रत्यक्षात संभाव्य राजकीय घडामोडींमध्ये मगर याना कितपत यश येते हे लवकरच दिसणार आहे.

राजेंद्र नागवडे यांनीही मगर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या आरोपांना जशास तसे प्रत्युत्तर देत निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केलेली आहे. 2019 मध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी विधानसभा निवडणुकीत विखेंचा शब्द घेत-देत राजकीय चमत्कार घडवल्याने नागवडे यांनी पाचपुतेंना पाठिंबा दिला होता. असे असले तरी पाचपुते यांना नागवडे यांच्या पाठिंब्याने कितपत लीड मिळाले हा अभ्यासाचा विषय आहे. दरम्यानच्या काळात नागवडे यांनीही राज्यातील सत्ता बदल झाल्यावर भाजपचे कमळ हातातून टाकून देत पुन्हा काँग्रेस जवळ जाणे पसंत केले.

यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिक जवळ नागवडे कुटुंब आहे. अजून तरी आ. बबनराव पाचपुते यांनी दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीबाबत वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. आत्ता नुकताच झालेला बापूंच्या पूर्णाकृती पुतळा उद्घाटन निमित्ताने राजेंद्र नागवडे यांनी शक्तिप्रदर्शन केले आणि कार्यक्रमात माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत डोळे दिपवणारा कार्यक्रम घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम घेतला आहे याचा किती फायदा नागवडेंना होतो हे लवकर कळेल.

राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप चेअरमन असणार्‍या (कुकडी) कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याचीही निवडणूक याच काळात होत आहे. जगताप यांना प्रखर विरोध करणारे भाजपचे दिनकर पंधरकर यांना मागील निवडणुकीत घनश्याम शेलार यांची साथ मिळाली होती. परंतु तालुक्यातील राजकीय बदलानंतर आता मात्र शेलार हे राहुल जगताप यांच्याबरोबर राहतील. असे असताना माजी मंत्री बबनराव पाचपुते हे जगताप यांच्या विरोधात कितपत विरोधकांना बळ देतात यावर जगताप विरोधकांची भिस्त आहे. दोन्ही निवडणुकीत राजकीय परिस्थिती पाहता राजेंद्र नागवडे यांच्यासाठी कसोटी दाखवणारी निवडणूक असताना राहुल जगताप यांना पुन्हा सत्ता ताब्यात ठेवताना फारसा विरोध होण्याची शक्यता नसल्याचा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com