
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील पेडगाव येथे भीमानदी पात्रात वाळू तस्करांवर प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या आदेशाने श्रीगोंदा महसूल विभागाने छापे मारत मोठी करवाई केली. दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू उपसा करणार्या वाहनांची धरपकड करण्यात आली. यात आठ मोठी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
पेडगाव येथील भूईकोट किल्ल्यालगत भीमानदी पात्रात रात्रंदिवस राजरोसपणे पोकलेन, जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर, डंपर यांच्या साहाय्याने अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे उत्खनन करून वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना समजली होती. त्यांनी रविवार सुट्टीचा दिवस सत्कारणी लावत दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पेडगाव मंडळ अधिकारी दिगंबर डहाळे, कामगार तलाठी एस. पी. बळी आणि चालक गाडीलकर यांना आदेश करत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार महसूल पथकाने भर पावसात भिजत नदी पात्रात छापा टाकला. तेथे त्यांना 3 पोकलेन, 1 जेसीबी, 1 ट्रक, 2 ट्रॅक्टर तसेच 50 बते 60 ब्रास वाळू मिळून आढळून आली. तर पथकाची सरकारी गाडी पाहताच नदी पात्रातील अनेक जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक वाळू तस्करांनी पळ काढला. या कारवाईमुळे वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत. कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील घोड, भीमा नदीच्या पात्रासह अन्य नदी पात्रात अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू आहे. याबाबत श्रीगोंद्यातील महसूल अधिकारी यांना अनेक तक्रारी येत असतात. पंरतु आलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवत याकडे दुर्लक्ष करत असल्याने वरिष्ठ अधिकार्यांना कारवाईची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे.
वाळू तस्कर लक्ष्य
कर्जत तालुक्यात तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रकार गुरूवारी रात्री घडला होता. यामुळे जिल्हाभरातील संतप्त महसूल अधिकार्यांनी आता वाळू तस्करांना लक्ष्य करत छापेमारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.