श्रीगोंदा तालुक्यात माती साठे पंचनाम्यात दुजाभाव

सरसकट पंचनामे करण्याची नागरीकांमधून मागणी
श्रीगोंदा तालुक्यात माती साठे पंचनाम्यात दुजाभाव

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यात मातीच्या साठ्यांचे पंचनामे सुरू झाले आहेत. मात्र काही ठराविक जणांचेच माती साठे मोजले जात असून राजकीय वरदहस्त असलेल्याचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी जेवढे मातीचे साठे आहेत. त्या सर्वांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील घोड नदीकाठी तसेच विसापूर जलाशयाच्या मधून उन्हाळ्यात काढलेल्या लाखो ब्रास मातीचे साठे करून ते वीटभट्टी साठी विक्री करण्यात आले होते. यात काढलेली रॉयल्टी आणि प्रत्यक्षात उपसा केलेली माती याचा हिशोबच जुळत नसल्याने याबाबत सार्वमतने दणका दिल्यावर पंचनामे सुरू झाले आहेत. महसूल विभागाची फसवणूक करत लाखो रुपयांची रॉयल्टी भरली नसल्याने माती साठ्यांचे काही ठिकाणी पंचनामे करण्यात येत आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील घोड, भीमा सीना नदीच्या पात्रातून वाळूची तस्करी होत असते पण सध्या चोरी चुपके सुरू असलेल्या वाळूच्या वाहतुकीचा मार्ग प्रशासनाच्या कारवाईने थांबला आहे. असे असले तरी अवैध गौंण खनिज उपसा सुरूच आहे. महसुल विभागाने शासनाचे आदेश असतानाही दगडखाणी आणि स्टोन क्रेशर वर कारवाई केली नसताना मागील वर्षी जेमतेम रॉयल्टीच्या पावत्या फाडून मोठया प्रमाणात वीट भट्टी साठी माती उपसा करण्यात आला होता. महसुल विभागाच्या या गोंधळाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महसूल प्रशासनाच्या माहिती प्रमाणे मार्च अखेरीस रॉयल्टीचा हिशोब होत असला तरी तो फक्त ज्यांनी रॉयल्टी फाडून माती, दगड वाहतुक केली त्याचांच. परंतु मोठया प्रमाणात अनधिकृत पणे माती, मुरूम, वाळु, दगड, खडी रॉयल्टी न भरताच उपसा होत आहे. निंबवी, विसापूर, घोड, नदीच्या पात्रात राजापूर, माठ परिसरात पन्नास, शंभर ब्रास ची रॉयल्टी घेऊन हजारो ब्रास माती साठा केल्याचे वास्तव आहे.

यांच्या रॉयल्टहीचे काय असा प्रश्न उपस्थित होत होता.याबाबतची बातमी सार्वमत मध्ये प्रसिद्ध झालेवर काही ठिकाणी पंचनामे सुरू केले मात्र त्यात दुजाभाव होत असून सरसकट सर्वच ठिकाणी पंचनामे तलाठी आणि मंडलाधिकारी करत नसल्याने काही पंचनामे का करण्यात आले नाहीत असा सवाल उपस्थित झाला आहे.

राजकीय वरदहस्त

श्रीगोंदा तालुक्यात मोठ मोठे मातीचे साठे करणारे मोठे मासे असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचे महसुल विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईत दिसून येत आहे. महसुल विभागाचे कर्मचारी गरीब कुंभार, छोटे विटभट्टी चालक अशाच काही ठराविक जणांचेच माती साठे मोजत असून कारवाईचा दिखावा केला जात आहे. यामुळे राजकीय वरदहस्त असलेल्याचे पंचनामे प्रथम करावेत अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com