श्रीगोंदा : कपाशीवर आढळली शेंदरी बोंडअळी
सार्वमत

श्रीगोंदा : कपाशीवर आढळली शेंदरी बोंडअळी

कृषि विभागाकडून रेड अलर्ट जारी

Nilesh Jadhav

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

श्रीगोंदा कृषि विभागाकडून क्रॉपसॅप या प्रकल्पांतर्गत खरीप पिकावरील किड व रोगांचे नियमित सर्वेक्षण केले जाते व त्यातील निरिक्षणाच्या अनुषंगाने कृषि विद्यापिठातील तज्ञांकडून सल्ला दिला जातो.

तालुक्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सुमारे २८०० हेक्टर वरील कपाशीचे पिक चांगले तरारुन आले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत क्रॉपसॅप अंतर्गत घेण्यात आलेल्या निरिक्षणात पारगावमध्ये कृषि विभागाला शेंदरी बोंडअळीचे पतंग आढळून आले आहेत. यात आढळून आलेली बोंडअळीची पातळी हि आर्थिक नुकसानीच्या पातळीवर असल्याने कृषि विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .

पारगाव येथील श्री. राजु सोपाना बोरुडे यांचे शेतात दि. १४ रोजी कापूस पिकात कामगंध सापळे लावले होते. दि १८ रोजी कामगंध सापळयाचे निरिक्षणे घेतले, असता गुलाबी बोंड अळीचे एका कामगंध सापळयात ५ ते ६ पतंग आढळून आले आहेत. कपाशी पिक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी फरदड घेतल्याने यंदाच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरवाती पासूनच कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी सद्यस्थितीत शेतामध्ये कामगंध सापळे लावून मोठया प्रमाणात पतंग पकडून नष्ट करावेत, शिवार फेरी करुन डोमकळया अळीसहीत नष्ट कराव्यात. प्रादुर्भाव ग्रस्त गळालेली बोंडे जमा करुन नष्ट करावीत. कामगंध सापळयामध्ये पतंग आढळल्यास जेविक किटकनाशके ५ टक्के निंबोळी अर्क किंवा बिव्हेरीया बॅसीयाना (जैविक किडनाशक) (१.१५ टक्के डब्लु.पी) ५ ग्रॅम ची फवारणी करावी. तसेच रासायनिक किटकनाशके इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के डब्लूजी किंवा स्पिनोटोरम ११.७ टक्के एससी. ची फवारणी करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्रीगोंदा यांनी केलेले आहे .

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com