उद्योग व्यवसाय करण्यासाठी श्रीगोंदेकरांना वेगळा न्याय का ?
सार्वमत

उद्योग व्यवसाय करण्यासाठी श्रीगोंदेकरांना वेगळा न्याय का ?

भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचा प्रशासनाला सवाल

Arvind Arkhade

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहर व तालुक्यातील अनेक नागरिक उद्योग-व्यवसाय करत असल्याने त्यांच्या दुकानांच्या वेळेत सुधारणा करून सदरची वेळ सायं 5 वरून सायं 7 वाजेपर्यंत करण्याची मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली.

करोनासदृश परिस्थितीमुळे तीन महिन्यांच्या काळासाठी झालेला लॉकडाउन हा छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर परिणाम करणारा ठरला. सर्व प्रकारच्या व्यावसायिकाना आर्थिक फटका बसू लागल्याने सर्वच व्यवसाय करणारे अडचणीत आलेले आहेत. सध्या कोव्हिड- 19 च्या प्रादुर्भावामुळे शासनाने काही नियम व अटींच्या आधारे व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यास वेळेचे बंधन घालून परवानगी दिलेली आहे.

शासनाने उद्योग व्यवसाय करण्यास सकाळी 9 ते सायं 7 वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे श्रीगोंदा शहर व तालुक्यात मात्र प्रशासनाने सकाळी 9 ते सायं 5 या वेळेतच उद्योग व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे प्रशासनाकडून सायं 5 नंतर उद्योग व्यवसाय बंद करण्यास विलंब झाल्यास संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

शासनाने उद्योग व्यवसाय करण्यास सकाळी 9 ते सायं 7 वाजे पर्यंत परवानगी दिलेली असतानाही आमच्या तालुक्याला वेगळा न्याय का असा प्रश्न श्रीगोंदा तालुक्यातील व्यावसायिकांना पडलेला आहे.

व्यावसायिकांना सध्या प्रशासनाने दिलेली वेळ अपुरी पडत असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींसह श्रीगोंदा शहर व तालुक्यातील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास सकाळी 9 ते सायं. 7 वाजेपर्यत वाढीव वेळ देण्याची मागणी या निवेदनात भाजपा पदाधिकार्‍यांनी केली आहे.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, नगरसेवक महावीर पटवा, अंबादास औटी कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे, सोशल मीडिया प्रमुख महेश क्षीरसागर, भाजपा सरचिटणीस दीपक हिरनावळे,बाळासाहेब गांधी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com