
श्रीगोंदा | Shrigonda
श्रीगोंदा शहरात दोन दिवसांपूर्वी संभाजी बिग्रेडचे शहराध्यक्ष सतिष बोरुडे याच्यावर नगरपालिकेसमोर हल्ला करण्यात आला. यानंतर बोरुडे यांनी तुषार जगताप यांच्यासह अन्य एक व्यक्ती वर गुन्हा दाखल केला.
मात्र यानंतर बोरुडे यांच्यावर देखील याच प्रकरणात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या नुसार गुन्हा दाखल झाला असल्याने शहरात नागरिकांनी घेतलेल्या बैठकीत चुकीच्या पद्धतीने बोरुडे यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याने पोलीस निरीक्षक रामराम ढिकले आणि माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या कार्यपद्धती विरोधात अनेक कार्यकर्ते आक्रमकपणे बोलत असून यामुळे शहरात राजकिय आणि सामाजिक वातावरण गरम झाले आहे. तसेच याच्या निषेधार्थ शनिवारी गाव बंद ठेवण्यात येणार आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते सतिष बोरुडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ संत शेख महंमद महाराज मंदिरात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी सभा घेतली. यात पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांनी चुकीच्या पद्धतीने बोरुडे यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचे टिळक भोस यांनी सांगितले.
तर पालिकेच्या कारभाराची माहिती मागत असल्याने आणि पालिकेच्या चुकीच्या कामावर बोट ठेवत असल्याने हा हल्ला करण्यात आला असे संतोष इथापे यांनी भाषणात सांगितले. यावेळी ऍड. संभाजी बोरुडे, ऍड. रुपाली बोरुडे, एम.डी .शिंदे, बापूसाहेब सिदनकर, दत्ताजी जगताप अख्तर शेख, भाऊसाहेब खेतमाळीस, राजू गोरे, राजू मोटे, जीवा घोडके, नंदू ससाणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.