श्रीगोंद्यात लिंबू खरेदीचा प्रश्न चिघळला, परवाना रद्द करण्याच्या नोटिसा
सार्वमत

श्रीगोंद्यात लिंबू खरेदीचा प्रश्न चिघळला, परवाना रद्द करण्याच्या नोटिसा

Arvind Arkhade

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारातील परवानाधारक लिंबू व्यापार्‍यांनी लिलाव करणे परवडत नसल्याने तसेच अन्य कारणे देत लिंबू खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजार समितीने या व्यापार्‍यांचे लिंबू खरेदीचा परवाना रद्द करण्याच्या नोटिसा या व्यापार्‍याच्या गाळ्यावर डकवल्या आहेत. बाजार समिती आणि व्यापारी समोरासमोर आले असून प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे.

श्रीगोंदा तालुक्यात लिंबू बागा मोठ्या प्रमाणात आहेत. इथले लिंबू देशभरात विक्रीसाठी जात असतात. मात्र या काळात सध्या लिंबाचे बाजार भाव चार ते पाच रुपये किलो असे कमी झाले आहेत. लिंबाचे भाव वाढावेत यासाठी शेतकरी, विविध संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी बाजार समितीच्या आवारात लिंबू खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनी लिंबाचे लिलाव करावेत मागणी केली.

मात्र लिलाव करण्यास व्यापार्‍यांनी नकार दिला. यात लिलाव करण्यात वेळ जातो, यासह अन्य कारणे आहेत. तेव्हा बाजार समितीने संबंधित व्यापारी ज्या बाजार समितीच्या आवारात लिंबू खरेदी करतात त्या गाळ्यावर या व्यापार्‍यांचा परवाना रद्द करण्याबाबतच्या नोटिसा डकवल्या आहेत.

लिंबू व्यापारी आणि बाजार समितीचे संचालक उमेश पोटे म्हणाले, लिंबू खरेदीवरून राजकारण सुरू आहे. उपसभापतींच्या सहीने परवाना रद्द करण्याच्या नोटिसा बजावणे चुकीचे आहे. सर्वांना विश्वासात घेऊन प्रश्न मिटवावा, लिंबू खरेदीवरून राजकारण करू नये.

बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते म्हणाले, व्यापार्‍यांनी नियमितपणे काम करावे, शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, शेतकर्‍यांना लिंबाचा योग्य मोबदला मिळावा, समितीच्या नियमाप्रमाणे काम केल्यास अजूनही संधी मिळेल.

Deshdoot
www.deshdoot.com