
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कामांची व गलथान कारभाराची चौकशी करण्यात यावी. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यात अनेक गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून परंतू काही गावांमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठ्याचे काम झाले व ती योजना अद्याप सुरू नाही. तरी जुन्या योजना पूर्ण होईपर्यंत नवीन कामांना सुरुवात करू नये. यासह विविध मागण्यांसाठी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलत असताना राजेंद्र म्हस्के म्हणाले की, सध्या प्रशासकीय पंचायत समिती कार्यालयात अंधाधुंदी कारभार चालू आहे. बांधकाम विभागात बोगस एबी रेकॉर्ड करून बिले अदा केली जात आहेत. ठेकेदार व संबंधित शाखा अधिकारी संगणमताने निधी लुटण्याचे काम करत आहेत. गाय-गोठा प्रकरणे जाणीवपूर्वक आर्थिक लाभासाठी अडवले जात आहेत.पंचायत समिती निगडित कामांसाठी लोकांना एका कामासाठी दहाबारा हेलपाटे मारावे लागतात.
प्रशाकीय कारभारामुळे अधिकार्यांचा मनमानी कारभार चालू आहे.जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत असे त्यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ बोलत असताना म्हणाले की, अधिकार्यांच्या टक्केवारीमुळे कोणत्याच कामाला दर्जा राहिला नाही.दलित वस्तीसाठी आलेला निधी दलित वस्तीत खर्च होत नाही.पंचायत समिती मधील अधिकारी प्रत्येक कामात आर्थिक तडजोड करताना दिसत आहेत.हे कुठं तरी थांबलं पाहिजे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राम जगताप यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी राम घोडके, शिवप्रसाद उबाळे, दत्तात्रय दांगडे, प्रमोद म्हस्के, महादेव म्हस्के मनोज शिंदे,माऊली माटे,अजिनाथ कळमकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे. परंतु पूर्वीच कोट्यावधी रूपये खर्च करून केलेली योजना सुरळीत चालू नाही. आता येणारी वाढीव पाणी पट्टी कशी भरतील.हे सर्व सामान्य कुटुंबासाठी शक्य नाही.ही योजना केवळ ठेकेदार व अधिकारी यांच्या फायद्याची पैसे कमवा योजना आहे.
- राजेंद्र म्हस्के, माजी पंचायत समिती सदस्य