श्रीगोंद्यात पदाधिकारी, अधिकार्‍यांमध्ये खडाजंगी

पंचानाम्यांमधील त्रुटी दूर करण्याच्या सूचना
श्रीगोंद्यात पदाधिकारी, अधिकार्‍यांमध्ये खडाजंगी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी होणार्‍या दिरंगाई बाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि.2) तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी शेतकरी व सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी आजपर्यंत सुमारे 70% पंचनामे झाल्याचे सांगितले. यावर शेतकरी, नेते व अधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

सद्य परिस्थितीत श्रीगोंदा तालुक्यात 72 टक्के सिंचनक्षेत्र असल्याने फळबागांसाठी हेक्टरी 36 हजार रुपये, बागायती क्षेत्रासाठी 27 हजार रुपये व जिरायती क्षेत्रासाठी 13 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाईची मदत असल्याने त्यातच तालुक्यात ऊस, द्राक्षे, डाळिंब, आंबा, लिंबोणी, पेरू, संत्रा, मोसंबी आदी पिकांचे पंचनामेच केले नसल्याने तालुक्यात प्रशासनाकडून 70 टक्के पंचनामे झालेच कसे? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने शेतकर्‍यांचा बांधावर जाऊन या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मुळात शेतकर्‍यांचे झालेले नुकसान एकरी काही लाख रुपयांत आहे. सरकार मात्र फळबागांना हेक्टरी 36 हजार, बागायती पिकांना 27 हजार तर जिरायत क्षेत्राला 13 हजार रुपये अशी तुटपुंजी मलमपट्टी करण्याचा घाट घालत आहे. सुमारे एक महिन्यापासून कृषी व महसूलचे कर्मचारी व अधिकारी पंचनामेच करत आहेत. तरीही अद्यापपर्यंत लाखो हेक्टर ऊस व फळबागांचे पंचनामे केलेच नाहीत.

शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा अशी पिके घेण्यासाठी मशागतीची कामे बाकी असल्याने त्यांना पंचनामे तात्काळ पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. पंचनामे पूर्ण होणार कधी? नुकसान भरपाई मिळणार कधी? असा प्रश्न तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत अनेक शेतकर्‍यांनी उपस्थित केला. अनेक शेतकर्‍यांनी व्यथा मांडली की आमच्याकडे साधे मोबाईल व तंत्रज्ञानाच्या अभावामुळे ई पीक नोंदणी करता येत नाही. तर प्रशासन ई पीक नोंदणीची अट घालत असल्यामुळे आम्ही पिकांची नोंद कशी करायची? त्यापेक्षा तलाठ्यांनी सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व गेल्या पाच वर्षांपासून विमा कंपन्यांनी पीक विमा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे.

या बैठकीत आ. बबनराव पाचपुते, तहसीलदार मिलिंद कुलथे, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गटविकास अधिकारी रामकृष्ण जगताप, शेतकरी नेते राजेंद्र मस्के यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

सवलती द्या

या बैठकीत अनेक शेतकर्‍यांनी राज्य सरकारने झालेल्या नुकसानीचे हेक्टरी लाखो रुपये द्यावेत. सुमारे सहा महिन्यांपासून पाऊस असल्याने विहिरीवरील विद्युत पंप बंद असल्याने वीज बीले माफ करण्यात यावीत. शेतकर्‍यांच्या मुलांची शैक्षणीक फी माफ करावी. हजारो हेक्टर ऊस व फळबागा सतत पाणी साचल्यामुळे सडल्या आहेत. त्यांचेही पंचनामे करावेत. त्याचप्रमाणे रब्बी हंगामासाठी बियाणे व खतांचा मोफत पुरवठा करण्यात यावा या व अनेक मागण्या शेतकर्‍यांनी बैठकीत केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com