
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागील अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र श्रीगोंदा नगरपरिषदेमधील पदाधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी नगरपरिषदेसमोर ठिय्या देत आंदोलन केले.
यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरात नागरी सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, ऐतिहासिक दिल्ली वेस मांडवगण रोड चे तातडीने संवर्धन करावे, मोकाट कुत्रे, डुकरांचा बंदोबस्त करावा, पारगाव रोड वरील अर्धवट काम केलेल्या ठेकेदारावर कारवाई सह सर्व 17 रस्त्यांचे खड्डे बुजवन्याचे काम तातडीने सुरू करावे, महात्मा फुले गार्डन शेजारील अभ्यासिका व क्रीडा संकुलचे काम तत्काळ सुरू करावे. 17 रस्त्यांवरील रस्ते दुभाजक दुरुस्त करून माती भरून झाडे लावावीत, बाजारतळातील लेंडी नाल्यावरील पूलाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे, अंदाजपत्रकाप्रमाणे 17 रस्त्यावरील कॅटआईज, लेन लाईन स्ट्रिप्स (पांढरे पट्टे), साईन बोर्ड तात्काळ लावण्यात यावे, मराठी शाळे समोर व कॅनरा बँक समोरील वळणावर गतिरोधक रंबल स्ट्रिप्स बसवणे, शहरातील वडाळी रस्त्यासह विविध ठिकाणच्या बस थांब्यांचे बांधकाम करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करण्यात यावी.
घनकचरा उचलण्यात मोठ्या प्रमाणावर अनियमत्ता होत असल्याने यात सुधारणा करण्यात यावी, नागरिकांच्या तक्रारीचा तात्काळ निराकरण करण्यासाठी बहुउपयोगी मोबाईल अँप तयार करावे, शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचे पेव फुटलेले आहे. त्यामुळे शहर विद्रुपीकरण होऊन पालिकेला आर्थिक नुकसान होत आहे. अशांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन ठोस कारवाई करण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर तातडीने उपायोजना सुरू न केल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी ढोरजकर यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, शहराध्यक्ष सतीश बोरुडे, संघटक दिलीप लबडे, झहीर जकाते, गणेश काळे, शिवराज ताडे, अजय शेळके, प्रदीप ढवळे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभान तांबोळी आदी उपस्थित होते.
नागरी सुविधेपेक्षा पद संरक्षण आणि राजकारण यात सत्ताधारी गुंतले असल्याने शहर वार्यावर सोडले आहे. खड्ड्यांमुळे कितीही अपघात झाले तरी त्यांना काही घेणे देने नाही. त्यामुळे जनतेने यांना धडा शिकवणे गरजेचे आहे.
- टिळक भोस, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड