श्रीगोंदा नगरपरिषदेकडून फायरबॉल खरेदीत भ्रष्टाचार

श्रीगोंदा नगरपरिषदेकडून फायरबॉल खरेदीत भ्रष्टाचार

संभाजी बिग्रेडची चौकशीची मागणी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

शहरात इमारत अगर कार्यालयांना लागलेली आग विझविण्यासाठी श्रीगोंदा नगरपरिषदेने 249 फायर बॉल खरेदी केले आहेत. मात्र यासाठी तब्बल 18 लाख रुपये मोजले आहेत. या खरेदीला घोटाळ्याचा वास येत असून फायर बॉलसह इतर झालेल्या खरेदीची चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकार्‍यांकडे केली असल्याचे शहर अध्यक्ष सतीश बोरुडे यांनी सांगितले.

श्रीगोंदा नगरपरिषदेत गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक निविदेतच गोंधळ होत असल्याचे आरोप आहेत. यात आता फायर बॉल खरेदीची भर पडली आहे. नगरपरिषदेने स्थायी सभेतील ठराव करून अशा प्रकारचे 249 फायर बॉलची खरेदी जीइएम पोर्टल वरून नुकतीच केली आहे. त्यासाठी एकूण खर्च 17 लाख 62 हजार 920 रुपयांचा केला आहे. हा खरेदीतील एकूण खर्च पाहिला तर प्रति फायर बॉल हा 7 हजार 80 रुपये असा दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात काही वितरकांकडून मिळालेल्या माहिती नुसार नगरपरिषदेच्या निकषानुसार दिलेला एक फायर बॉल 1450 रुपयांना मिळू शकतो त्यातही वेगवेगळ्या स्कीम असून 199 पेक्षा अधिक फायर बॉल खरेदी केल्यास कपंनी जेमतेम 1250 रुपयांना एक याप्रमाणे दर आकारू शकते. अशाच प्रकारे अन्य कंपन्यांचे दर आहेत.

जीएसटी 18 टक्के धरूनही प्रति फायर बॉल अगदी टोकाची रक्कम धरली तरी 1600 ते 1800 रुपयांपेक्षा अधिक दर नाही. एमआरपीचा आधार घेतला तरी चार हजार रुपयांच्या आतच एक फायर बॉल मिळू शकतो मग एका फायर बॉलची किंमत 7 हजार 80 रुपये कोणी ठरवली, असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेने आजवर कधीच या साधनाचा वापर केलेला नाही. त्यामुळे प्रयोगिक तत्वावर काही फायर बॉल वापरून त्याची व्यवहार्यता तपासून मग खरेदी करणे आवश्यक होते. पण तसे न करता थेट अठरा लाख रुपयांची खरेदी करण्यात आलेली आहे. यातून संबंधित कंपनीच्या नावे नगरपरिषदेकडून दुप्पट रक्कम उकळण्यात आल्याचे समोर येत आहे. हा सर्व भ्रष्टाचाराचा प्रकार असून याची चौकशी तात्काळ व्हावी,अशी मागणी संभाजी बिग्रेडचे शहर अध्यक्ष सतीश बोरूडे यांनी केली आहे.

काय आहे फायर बॉल?

आग विझविण्यासाठी एक प्रकाराचे हे साधन असून आग लागल्यास त्या ठिकाणी हे फायर बॉल फेकले जातात ते फुटून अग्निशमन करणारी पावडर पडते आणि त्यातून आग विझण्यास मदत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com