
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यावर आरोप असलेल्या गैरकारभाराची निपक्ष चौकशी करणेसाठी बाजार समिती संचालक मंडळाच्या झालेल्या सभेमध्ये सचिव डेबरे यांचे सहयांचे अधिकार काढण्यात आले आहेत. त्यांचे ऐवजी प्रभारी सचिव म्हणून राजेंद्र लगड यांची नियुक्ती केली आहे.
श्रीगोंदा बाजार समितीची मासिक सभा सोमवारी (दि.28) सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये प्रामुख्याने सचिवांच्या गैर कारभाराचा प्रमुख विषयावर चर्चा झाली. बाजार समितीचे सचिव असलेले डेबरे हे गेली 25 वर्षापासून काम करत होते. त्याचे कार्यकालात बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा संचालक मंडळाने ठपका ठेवला आहे. मागील कालावधीत त्यांच्या मोठया प्रमाणात तक्रारी बाजार समितीकडे आलेल्या होत्या. परंतु तत्कालिन संचालक मंडळाने त्याची दखल न घेतल्यामुळे डेबरे यांनी मोठया प्रमाणात गैरव्यवहार केला असल्याचे आरोपांची चौकशी स्थगित होती.
या सभेमध्ये संचालकांनी बहुमताने डेबरे याच्या गैरकारभाराची चौकशी करणेसाठीचा मांडलेला ठराव बहुमताने मंजुर केला. त्यामध्ये सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनिषा मगर, ज्येष्ठ संचालक भास्करराव वागस्कर, बाबासाहेब जगताप, दिपक पाटील भोसले, नितीनराव डूबल, अजित जामदार, अंजली रोडे, दत्तात्रय गावडे, किसन सिदनकर उपस्थित होते.
अध्यक्ष असताना कर्मचार्यांची अडवणूक
डेबरे हे गेली 10 वर्ष बाजार समिती कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष होते. परंतु त्यानी स्वत:च्या बाजार समितीचे सेवानिवृत्त झालेले सहा कर्मचार्यांचे जवळपास काही लाखाची देणी दिलेली नव्हती. कर्मचार्यांचे देणे बाकी असताना सातवा वेतन आयोग लागू करुन स्वत:चा दरमहा दिड लाख पगार करुन मागिल फरकही घेतला होता. स्वत:चे कर्मचार्यांना न्याय न देणारा कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे. असे मत सेवानिवृत्त कर्मचार्यांनी व्यक्त केले.