
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव दिलीप डेबरे यांनी कांदा अनुदानात 3 कोटी रुपयांचे बोगस अनुदान लाटण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यावर तक्रार देत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बीआरएसचे टिळक भोस यांनी केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दोन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या अनुदानाच्या कागदपत्रे तपासणीला सुरुवात केली आहे.
बीआरएस पक्षाचे टिळक भोस यांनी केलेल्या आरोपात बाजार समितीतील काही व्यापार्यांच्या नावावर बोगस कांदा पावत्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी मर्जीतील शेतकर्यांनी त्यांच्याकडे कांदा विकल्याचे दाखवले आहे. अशी तक्रार भोस यांनी केली होती. मागील खरीप हंगामातील कांद्याला राज्य सरकारने क्विंटलला 350 रुपये अनुदान जाहीर केले होते. त्या अनुदानाच्या अनुषंगाने श्रीगोंदा बाजार समितीमध्ये तत्कालीन सचिन यांनी काही व्यापारी यांना हाताशी धरून हा घोटाळा केला आहे.
ही घोटाळ्याची रक्कम काही कोटींच्या घरात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर तत्कालीन सचिव यांचे सह्यांचे अधिकार संचालक मंडळाने काढले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. 2022-23 च्या कांदा अनुदानात बाजार समितीत हा घोळ झाला असून सहायक निबंधक रावसाहेब खेडकर व विशेष लेखापरीक्षक एस. एन. खर्डे यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने आता या आरोपाच्या अनुषंगाने आज 5 सप्टेंबरपासून कांदा अनुदानसाठी आलेली कागदपत्रे तसेच व्यापारी यांचे दप्तर यांची तपासणीस सुरुवात केली आहे.