श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीत फुटला मतांचा बाजार

नागवडे, पाचपुतेंसह जगतापांची प्रतिष्ठा पणाला
श्रीगोंदा बाजार समिती
श्रीगोंदा बाजार समिती

श्रीगोंदा | Shrigonda

श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांवर होत असलेल्या निवडणुकीत नागवडे, पाचपुते समर्थक पॅनल विरोधात जगताप, नाहटा, शेलार आणि सोबतीला साजन पाचपुते यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये होत असलेल्या अटीतटीच्या लढतीत एक एक मताला किंमत आली असून बाजार समितीच्या निवडणुकीत मतांचा बाजार फुटला असल्याचे चित्र दिसत आहे. मतदानाच्यावेळी कोणाची हरी पत्ती जड यावर निकालाची दिशा ठरणार असेच सध्या दिसत आहे.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी अठ्ठेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत. ज्यांना उमेदवारी दोन्ही गटाकडून मिळाली नाही असे काही जण अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. असे असले तरी निवडणुकीत कोणाचा जोर अधिक पडतो हे सध्या तरी सांगता येत नाही. निवडणूक कधी नव्हे ती उमेदवारांसाठी खर्चीक ठरत आहे.

अठरा जागांमध्ये सेवा संस्था मतदारसंघात अकरा जागा असून 2 हजार 116 मतदार आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात चार जागा असून 795मतदार आहेत.तर व्यापारी मतदारसंघात दोन जागा आणि 287 मतदार आहेत. हमाल मापडी मतदारसंघात एक जागा आणि105 मतदार आहेत.

नागवडे पाचपुते यांची आघाडी असल्याने तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत आणि सेवा संस्थांवर त्यांचा प्रभाव आहे.असे असले तरी माजी आमदार राहुल जगताप यांच्या ही समर्थकांच्या ताब्यात काही ग्रामपंचायत आणि सेवा संस्था आहेत. व्यापारी मतदारसंघातही नागवडे, पाचपुते यांचा प्रभाव दिसत आहे.तर हमाल मापाडी मतदारसंघात यापूर्वीचे संचालक असलेले कोथिंबीरे यांना पुन्हा उमेदवारी दिली असल्याने ते कुठला करिष्मा करतात यावर बेरजेचे गणीत अवलंबून आहे.

तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता आता नागवडे ,पाचपुते यांच्याकडे सत्ता मिळण्यासाठीची बेरिज जुळवणे सोपे असले तरी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यात जगताप, नाहटा आणि साजन पाचपुते यांनी पाहिली फेरी पूर्ण केली आहे. नागवडे ,पाचपुते यांच्या समर्थक पॅनलमध्येही मातब्बर उमेदवार आहेत.

टोकण तर ठेवा बाकी पुन्हाचे आश्वासन

निवडणूकीत सध्या रंग भरत आहेत.प्रचार गावभेटी आणि समक्ष जाऊन भेटी देऊन सुरू आहे .माजी नेत्यांच्या समर्थकांनी तर टोकण दिले आहे.हे टोकण देऊन पुन्हाचे आश्वासन दिले असल्याचीही चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com