
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा शहराच्या बाजुच्या मळे परिसरातील आनंदकर मळा, खेतमाळीस मळा आणि शेंडगे वाडी या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. सदर बिबट्या सतत नागरिकांच्या नजरेस पडत असून या बिबट्याची दोन लहान पिले सुद्धा या भागात वारंवार दिसून येत आहेत. यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
याबाबत श्रीगोंदा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाकडे वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही काहीही उपयोग होत नसल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. या भागातील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याचे सोडून उलट वन विभागाचे अधिकारी नागरिकांना शेतात शक्यतो जात जाऊ नका, शेतात जर जायचेच असेल तर सकाळी 10 वाजल्यानंतर जाऊन परत 5 वाजेच्या आत परत घरी येत जा, असे सल्ले देत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
शेतकर्यांनी उपवनसंरक्षक अधिकारी यांना निवेदन दिले असून बिबट्याचा बंदोबस्त केला नाही ते आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.बिबट्याने धुमाकूळ घातलेला असल्याने नागरिक आणि शेतकर्यांच्या मनात प्रचंड दहशत आहे. तसेच शेतकरी शेतात जायला घाबरतआहेत, शेतीचा हंगाम सुरु असूनही शेतीची कामे पूर्ण ठप्प झाली आहेत आणि लहान मुले शाळेत जायला घाबरत आहेत. बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी करत आंनदकर , खेतमाळीस, शेंडगे, लोंढे आदी पन्नास ते साठ शेतकर्यांनी सह्याचे निवेदन दिले आहे.