
श्रीगोंदा |ता. प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेले एका वाड्याच्या बाजूला सहा ते सात तरुणांनी नशा करून हातात फटाके घेऊन उडवत असतांना सुरू असलेल्या गोंधळ बाबत सामान्य नागरिकांनी विचारणा केल्याचा राग आल्याने या तरुणांनी एक ते दोन तास नागरी वस्तीमध्ये गोंधळ घातला. पोलिसांना माहिती दिली म्हणून हातात कोयते आणि काठ्या घेऊन दहशत करत तुफान राडा केला.
यामुळे माहिला आणि नागरिक भयभीत झाले होते. रात्री उशिरा पोलीस पोहोचल्यावर हे अज्ञात तरुण फरार झाले. यातील काही तरुण अल्पवयीन असल्याचे सांगितले जात असले तरी एखाद्या चित्रपटाला शोभावे अशी स्टाईल करत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कायद्याचा धाक राहिला नसल्याने असा प्रकार होत असल्याचे माहिला आणि नागरिक यांनी सांगितले.
श्रीगोंदा शहरातील कुंभार गल्ली परिसरात नागरी वस्ती मध्ये एक वाड्याच्या बाजूला रोज रात्री काही तरुण एकत्र जमून गोंधळ करत असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करत असल्याने याबाबत या वस्तीतील नागरिकांनी विचारणा केली. या तरुणांनी या विचारणा करणार्या नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर नागरिकांना समोर या आम्ही तुम्हाला हिसका दाखवतो असा दम हे तरुण देत होते.
यानंतर यातील काही तरुण हातात कोयता आणि काठया घेवून आले. गोंधळ सुरू असल्याने शहरातील अन्य नागरिक जमा झाले. यानंतर पोलिसांना ही बोलावण्यात आले. परिसरातील नागरिक जमा झाले याच वेळी पोलीस ही आल्याने यातील काही तरुण पळून गेले. पण या तरुणानी केलेली दहशत पाहून शहरात माहिला आणि सामान्य नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.