
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
पावसाळ्याच्या तोंडावर श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्राखाली पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्याने जलसंदामंत्री जयंत पाटील, आ. निलेश लंके,आ. रोहित पवार, आ. संजयमामा शिंदे, कालवा सल्लागार समिती व अधिकार्यांशी चर्चा करून 10 जून पासून कुकडी डाव्या कालव्याचे विशेष पंधरा दिवसांचे आवर्तन सोडले आहे.
अत्यंत कमी कालावधीचे आवर्तन असल्याने तालुक्यातील सर्व वितरिका खालील शेतकर्यांनी पाण्याची हेळसांड न होऊ देता शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सदुउपयोग करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व कालवा सल्लागार समितीचे सदस्य घनशाम शेलार यांनी श्रीगोंदा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी शेलार म्हणाले की टेल टू हेड असलेले आवर्तन करमाळा 5, कर्जत 6 व श्रीगोंदा तालुक्यासाठी 4 दिवसांचे आहे. यात अजुन वाढ होऊ शकते. मागील आवर्तनात कमी गेज व सुसुत्रतेच्या अभावामुळे विस्कळीतपणा आल्यामुळे आपण चार दिवसांचे अतिरिक्त आवर्तन वाढवले होते. जवळपास सहा हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली असलेल्या 132 वितरिकेला वहन क्षमता योग्य दाबाने झाल्यावर पूर्ण क्षमतेने त्वरित पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सहा गावांच्या शेतीला पाणी मिळणार आहे. तालुक्यातील सर्व वितरिकांना पुरेसे पाणी मिळुन उद्भवलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकर्यांनी पाण्याचा योग्य वापर करून आवर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन शेलार यांनी केले आहे.