श्रीगोंदा |प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी काम करत असले तरी अवैध व्यवसायात काही धंदे राजरोसपणे सुरू आहेत.

अवैध दारू विक्रीवर कारवाईसाठी तसेच गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध पथके काम करत असली तरी श्रीगोंदा तालुक्यातील अवैध गुटख्याच्या धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला फारसे यश आले नसल्याने शहरासह तालुक्यातील विविध गावांत गुटख्याच्या विक्रीत भाईचा हात धरण्यात यश येताना दिसत नाही.

यातच पान टपर्यांवर राजरोसपणे गुटखा विक्री होत असताना या टपर्यांपर्यंत होलसेल दरात विक्रीस बंदी असलेला गुटखा पोहोच देणारी यंत्रणा असल्याने यात अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी राज्य सरकारने गुटखा बंदीचा चांगला निर्णय घेतला असला तरी परराज्यातून गुटखा विक्रीसाठी ग्रामीण भागात येत आहेत.

आपल्या राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट, सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट, सुगंधित सुपारी, खर्रा इत्यादींची कोणीही विक्री करीत असेल तर त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून फौजदारी खटला भरला जाऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने काढलेल्या बंदीचा आदेश मोडून कोणीही अशा पदार्थांची विक्री करत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कारवाई करते. मात्र याविभागाकडे असणारी तोकडी यंत्रणा आणि याशिवाय असलेली असंख्य कामे यामुळे अन्न औषध प्रशासनाचे काम पोलीस यंत्रणेकडे अधिक येत आहे.

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात असणार्या शेकडो पान टपर्यांवर मोठ्या प्रमाणात सुगंधित सुपारीबरोबर मिक्स नावाने गुटखा सदृश पदार्थ विक्री होत आहे.या मिक्सच्या दोन पुड्या एकत्र केल्यानंतर तो गुटखा म्हणून खाल्ला जात आहे.

पान, चुना,तंबाखू झाली गायब आता फक्त मिळतेय मिक्स

आरोग्यासाठी हानीकारक असणारा गुटखा हा अनेकजण हौसेने खात आहेत. याचे दूरगामी परिणाम शरिरावर होत असून अनेक तरुण यामुळे उद्ध्वस्त होत असले तरी आता पान, चुना आणि तंबाखू याच्याही पुढे जाऊन सर्रासपणे मिक्स नावाने गुटखा खाल्ला जात आहे.याची विक्रीही जोरात सुरू आहे. याकडे कोणी संबंधित लक्ष देतो की नाही, अशी चर्चा नागरिकांत होत आहे.