श्रीगोंद्यातील बनावट दूध प्रकरणातील संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले

पोलिसांचे हजर होण्याचे आदेश || दसरा, दिवाळी जाणार तुरुंगात
श्रीगोंद्यातील बनावट दूध प्रकरणातील संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीसह विविध ठिकाणी पॅराफिन रसायनाद्वारे बनावट दूध बनवण्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणला होता. यातील 13 संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालय तर काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळले असून एफडीए व पोलिसांनी त्यांना हजर होण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता दूधभेसळ मधील आरोपींना अटक होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे आता त्यांचे दसरा, दिवाळी हे सन जेलमध्ये साजरे होणार आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या ठिकाणी 16 मार्च रोजी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी बाळासाहेब पाचपुते यांच्या गोठ्यात छापा मारून बनावट दूध तयार करण्याचे पॅराफीन सह साहित्य जप्त केले होते. त्यावरून 17 मार्च रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुरुवातीला काष्टीतील बाळासाहेब पाचपुते यांच्यावर गुन्हा दाखल झाला. नंतर गुन्ह्याची व्याप्ती वाढत तब्बल 24 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी संदीप मखरे, वैभव राऊत, कैलास लाळगे, वैभव हांडे, संजय मोहिते, विशाल वागस्कर, अनिल कुदांडे, हेमंत टेके याना अटक करण्यात आली. तर बाळासाहेब पाचपुते, सतीश उर्फ आबा कन्हेरकर, महेश मखरे, शुभम नवनाथ बोडखे, समीर शेख, सविता हांडे, शाकीर कामोरोद्दीन शेख, अजित वागस्कर, दीपक वागस्कर, दीपक करंजुले, अतुल बारगुजे यांनी सुरुवातीला श्रीगोंदा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता.

मात्र श्रीगोंदा न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला. त्यावर त्यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अर्ज केला. उच्च न्यायालयानेही हा अर्ज फेटाळला आहे. यातील 3 जणांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. या न्यायालयानेही अर्ज फेटाळल्याने सर्व संशयितांना तात्काळ पोलीस ठाण्यात हजर होण्याचे सक्त आदेश दिले आहेत. तर त्यातील दोन आरोपी हाजी अब्दुल शेख, रामदास बबन नेटके यांनी अद्यापही कोणत्याही न्यायालयात दाद मागितलेली नाही त्यामुळे त्यातील तब्बल 13 आरोपींच्या समोर अटकेला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यामुळे दूध भेसळ प्रकरणातील आरोपींना पोलीस लवकरच जेरबंद करणार असून त्यांचा दसरा दिवाळी हे दोन्ही मुख्य सण जेलमध्येच जाणार असल्याची चर्चा आहे.

हजर न झाल्यास उचलणार

दूध भेसळ प्रकरणातील तपासी अधिकारी पोलीस हवालदार समीर अभंग यांनी सांगितले की, सदर गुन्ह्यातील 13 आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने त्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश दिले आहेत. हजर न झाल्यास छापे टाकून त्यांना तात्काळ जेरबंद करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com