घोड नदी पात्रात विना रॉयल्टी मातीचा उपसा

वीट भट्टीसाठी माती वाहतूक
घोड नदी पात्रात विना रॉयल्टी मातीचा उपसा

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील मौजे माठ, राजापूर गावच्या हद्दीतून वाहणाऱ्या घोड नदीच्या पात्रातून बेसुमार पोयटा वाहतूक विनापरवाना सुरु आहे.

कुठलीही परवानगी नसताना तीस ते चाळीस जेसीबी, पोकलॅन्ड तसेच दोनशे ते तीनशे ट्रॅकटर, ट्रक, हायवाच्या साहाय्याने वीट भट्टीसाठी गौणखनिज पोयटा मातीचा बेसुमार उपसा सुरु असताना माठ गावच्या हद्दीत महसूल यंत्रणेने आत्तापर्यंत कुठलीच कारवाई केली नसल्याने राजकीय सांगड आणि झोपलेले महसूल प्रशासन यामुळे गावातले सर्वसामान्य नागरिक मात्र या वाहनाच्या वर्दळीमुळे आणि या वाहनाच्या मधून उडणाऱ्या धूळ आणि मातीमुळे त्रस्त झाले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात शिरूरच्या दिशेने घोड नदी प्रवेश करते. या घोड नदीच्या पात्रावर चिंचणी धरण आहे. या धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणारे माठ गावच्या हद्दीत घोड नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणत वाळु आणि वीट भट्टी साठी लागणार पोयटा माती आहे. सध्या नदीच्या पात्रातील पाणी आटले असल्याने या भागात असणाऱ्या शेकडो वीट भट्टी चालकांनी या नदीच्या पात्रातून विनापरवाना महसूल बुडवून मातीचा उपसा सुरु केला आहे.

नदीच्या पात्रात जेसीबी, पोकलॅन्डच्या साह्याने ट्रॅक्टर, ट्रक, हायवा गाडीमधून लाखो ब्रास मातीचा उपसा राजरोस पणे मागील एक महिन्याच्या पासून सुरु आहे. महसूल यंत्रणा याबाबत कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने गावातील अनेक नागरिक या सर्व प्रकारामुळे त्रस्त झाली आहे. नदीच्या पात्रातून बाहेर येणारा रस्ता गावतून जातो यामुळे गावची झोप उडाली आहे. रात्र-दिवस या मातीचा, वाळूचा उपसा होत असल्याने या बाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे .

Related Stories

No stories found.